‘पुढचं पाऊल’, ‘अग्निहोत्र’ या मालिकांमुळे अभिनेता आस्ताद काळे घराघरांत लोकप्रिय झाला. यानंतर त्याने ‘बिग बॉस मराठी’मध्ये सहभाग घेतला होता. या शोमुळे आस्तादचा एक वेगळा चाहतावर्ग तयार झाला. उत्तम अभिनयाबरोबरच आस्ताद त्याच्या स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखला जातो. नुकतीच त्याने ‘आरपार’ या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी अभिनेत्याने अनेक गोष्टींवर त्याच स्पष्ट मत मांडलं.

गेल्या काही दिवसांत सोशल मीडिया ट्रोलिंग मोठ्या प्रमाणात वाढलंय तर, पूर्वीचा काळ नेमका कसा होता? याविषयी सांगताना आस्ताद काळे म्हणाला, “समाजात वावरणारे जे पब्लिक फिगर्स असतात ते कायम प्रत्येक गोष्टीत सॉफ्ट टारगेट होतात. कारण, त्यांच्याकडे सगळ्यांचं लक्ष असतं. आता समजा एखादा समाज हजार लोकांचा असेल तर, त्यातील आठशे लोकांचं तरी सर्वांकडे लक्ष असतं. दोनशेपैकी काही लोक अनभिज्ञ असतात, तर उरलेल्या लोकांना काहीच देणंघेणं नसतं. एखाद्या जमावाला जसा चेहरा नसतो तसा ट्रोलर्सला सुद्धा चेहरा नसतो.”

हेही वाचा : “मन भरून आलं…”, Cannes मध्ये पुरस्कार जिंकल्यावर छाया कदम यांची पहिली पोस्ट; म्हणाल्या…

आस्ताद पुढे म्हणाला, “अलीकडच्या काळात अनेक ट्रोलर्स बनावट अकाऊंटवरून ट्रोल करतात. त्यामुळे या लोकांचं मनाला किती लावून घ्यायचं किंवा ते लोक जे भांडवल करतात याला आपण किती महत्त्व द्यायचं हा पुन्हा आपला प्रश्न आहे. नक्कीच पूर्वीपेक्षा याचं प्रमाण वाढलंय. याबद्दल सांगायचं झालं, तर हरिश दुधाडे सचिन पिळगांवकरांबरोबर एक चित्रपट करतोय. ते त्याला सांगत होते, पूर्वी त्यांच्या उमेदीच्या काळात म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, महेश कोठारे त्यांचा जो काळ होता तेव्हा त्यांना प्रेक्षकांशी कनेक्ट होता येत नाही याचं त्यांना फार वाईच वाटायचं.”

“प्रेक्षक आपल्याला फक्त पडद्यावर पाहतात किंवा नाटक आपण केलं तरच प्रेक्षकांशी भेट होते…एकंदर प्रेक्षकांशी कनेक्ट ठेवायला आपल्याला प्रयत्न करावे लागतात अशी स्थिती होती… असं या दिग्गज कलाकारांना वाटायचं. यानंतर मध्यंतरी सचिनजींचं एक गाणं प्रदर्शित झालं. त्या व्हिडीओला बरंच ट्रोल करण्यात आलं. त्यांनी तो व्हिडीओ का केला, तो चांगला होता की, वाईट या सगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. पण, तेव्हा त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोलिंग अनुभवायला मिळालं होतं त्यावरून ते हा संपूर्ण प्रसंग सांगत होते. त्या क्षणाला त्यांना असं वाटलं तो पूर्वीचा काळ बरा होता. थेट लोकांना आपल्यापर्यंत पोहोचता यायचं नाही असं सचिनजींचं मत झालं. मला सांगायचंय काय तर, या ट्रोलर्सना धरबंद राहत नाही. फार पटकन एखाद्याच्या आडनावावर जाणं, घरच्यांवर जाणं, आई-वडिलांवर जाण्याची नाही” असं मत आस्ताद काळेने मांडलं.

हेही वाचा : Video : नारकर जोडप्याला पडली मल्याळम भक्तिगीताची भुरळ, जबरदस्त हावभाव पाहून नेटकरी म्हणाले, “तुमचे रील्स…”

वैयक्तिक आयुष्यात झालेल्या ट्रोलिंगबद्दल आस्ताद काळे म्हणाला, “मलाही अनेक गोष्टींमध्ये ट्रोल केलं गेलंय. मी कोणतंही मत मांडलं की, लोकांना वाटतं नवीन प्रोजेक्ट येणार म्हणून मी असं बोलतोय. दुसरी गोष्ट म्हणजे ट्रोलर्स जातीवरून लगेच काहीही बोलतात. कोणतीही गोष्ट धार्मिक, राजकीय आणि जातीय मुद्द्यांकडे वळवणं हा ट्रोलर्सचा छंद आहे. पुन्हा एकदा तेच सांगेन यांना चेहरा नसतो. माझी मतं सभ्य भाषेत मांडण्याचा मला पूर्ण अधिकार आहे. एका पोस्टमध्ये मी शिवी वापरली होती तेव्हा काही लोकांनी खूप छान पद्धतीने ‘दादा तुझा मुद्दा बरोबर आहे पण, शिवी वापरू नकोस’ असं म्हटलं होतं. या गोष्टी मी नक्कीच स्वीकारतो. तेवढी एक चूक माझ्याकडून झाली होती. पण, त्या व्यतिरिक्त मी सभ्यतेची पातळी सोडून कधीच काहीच बोलत नाही.”