मनोरंजनाच्या महत्वाच्या साधनांमध्ये चित्रपटांचा वाटा मोठा आहे. आता या क्षेत्रातही स्पर्धा वाढताना दिसत आहे. एखादा चित्रपट मोठ्या प्रमाणात गाजतो, तर अनेक सिनेमे अपयशी ठरताना दिसतात. अलीकडे अनेक चित्रपटांकडे प्रेक्षक पाठ फिरवताना दिसतात. आता यावर ‘मुंज्या’ या गाजलेल्या चित्रपटाचा दिग्दर्शक आदित्य सरपोतदार(Aditya Sarpotdar)ने वक्तव्य केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लोकप्रिय मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर व दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांनी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनेवर नुकतीच हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी दिलखुलास गप्पा मारल्या. मराठी सिनेमा, मनोरंजनसृष्टीतील अनेक बाबी, प्रेक्षकांचा दृष्टीकोण अशा अनेक पैलूंवर त्यांनी चर्चा केली. यावेळी त्यांनी नंबर्स म्हणजेच कमाईचे आकडे किती महत्वाचे असतात, कोणत्या प्रकारचे सिनेमे पाहण्याकडे प्रेक्षकांचा कल आहे, यावर आदित्य सरपोतदारने वक्तव्य केले आहे.

२५०-३०० रूपये देऊन प्रेक्षक…

मराठी सिनेमांनी खरंच कमाईचे आकडे दाखवण्याची गरज आहे का? असे सई ताम्हणकरने आदित्य सरपोतदारला विचारले. यावर बोलताना आदित्य सरपोतदारने म्हटले की आपण पाहिलंय ना सैराटने जेव्हा तो ठराविक आकडा गाठला किंवा वेड, बाईपण भारी देवा या सिनेमांनी एक आकडा गाठल्यानंतर संपूर्ण इंडस्ट्रीमध्ये एक ऊर्जा आली. हे कुठेतरी होऊ शकतं आणि आपण सगळे मिळून हे करू शकतो. आता ती ऊर्जा आपल्याला सतत हवी आहे. पण, सगळ्यात अवघड भाग काय आहे तर, आपण लोकांना सिनेमे बनवण्यापासून थांबवू शकत नाही. वाईट सिनेमांचे प्रमाण जास्त आहे. प्रेक्षकांचा अपेक्षाभंग झाल्यानंतर प्रेक्षक मग माघार घेतात. आपण बघितलेले मागचे चार सिनेमे वाईट होते, मग आपण पाचव्या चित्रपटाला संधी का द्यायची? असा प्रेक्षक विचार करतात. पण, पाचवा चित्रपट नेमका चांगलाच असतो.

आपल्याकडे जे तिकीटांचे दर आहेत, आपण त्याकडेसुद्धा बघत नाही.आपण अपेक्षा ठेऊ शकत नाही की २५०-३०० रूपये देऊन प्रेक्षक सिनेमा बघायला येतील आणि अशी अपेक्षा ठेवणं चुकीचंसुद्धा आहे. खूप कमी सिनेमे असे असतात, ज्याला त्या पातळीवर जाऊन प्रेक्षक तिकिट काढतात. पण, आपल्या प्रेक्षकांच्या दृष्टीकोणातून जर बघितलं तर जेव्हा सिनेमा दिनानिमित्त तिकीटदर ९९ रूपये असतात, त्यावेळी गर्दी असते. तर ही गर्दी का असते? कारण-मग लोकांना सिनेमे बघायचे नाहीत, असं नाहीये. पण काय किंमत देऊन त्यांना हे चित्रपट बघायचे आहेत, याचा प्रेक्षक विचार करतात.”

यावर अधिक बोलताना आदित्य सरपोतदारने म्हटले की आता पाहिलं तर भारतात एक ट्रेंड सुरू आहे. आपल्याकडे चित्रपटगृहात दोन पद्धतीचे सिनेमे चालत आहेत. सीक्वेल्स आणि री-रीलीज हे ते ट्रेड आहेत. सीक्वेल्स आणि री-रीलीज का चालत आहेत? यावर माझं मत असं आहे की या दोन्हीमध्ये एक कम्फर्ट स्पेस आहे की मी जे बघायला जातोय ते वाईट नसणार. ठराविक पातळीवरची गॅरंटी असणार आहे. री-रीलीजमध्ये एकतर आठवणी आहेत. एकतर हा चित्रपट मी पाहिला होता, आता त्याचा वेगळ्या पद्धतीने अनुभव घेऊयात. किंवा सीक्वेलमध्ये ती गॅरंटी असते की तेच पात्र पुढे येणार, तेच जग, लोकं यांना पाहण्यात मजा येईल. असे सिनेमे फसू शकतील याची टक्केवारी कमी असते.

प्रेक्षकांना रिस्क घ्यायची नाही. कारण- सिनेमा बघण्यात फक्त तेवढाच वेळ नसतो. तर जाण्या-येण्याचा वेळही असतो. त्यामुळे प्रेक्षकांना वेळ, पैसा सगळंच महत्वाचं आहे. त्यामुळे ही संधी द्यायची का, रिस्क घ्यायची का, ते जरा कमी झालंय. रिस्क लोकं कधी घेतात, जेव्हा त्यांना विश्वास वाटतो की अमुक अमुक सिनेमा ठराविक पातळीपेक्षा खाली जाणार नाही.तिथून किती वर जाईल, ते बघूयात. तर तसा सिनेमा प्रेक्षक थिएटरमध्ये जाऊन नक्कीच बघतात”, असे म्हणत प्रेक्षक अनेक चित्रपटांकडे पाठ का फिरवतात, प्रेक्षकांचा काय दृष्टीकोण असू शकतो, यावर आदित्य सरपोतदारने मत व्यक्त केले आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Munjyas director aditya sarpotdar how important is it for marathi films to show revenue figures nsp