रसिका शिंदे  

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

करोनाचे संकट दूर झाले आणि मनोरंजनसृष्टीची वाट मोकळी झाल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. एरवी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर अनेक नवीन नाटकांच्या घोषणा ऐकण्याची सवय मराठी मनांना आहे. मात्र यंदा दसऱ्याआधीच अनेक नवीन मराठी नाटकं प्रेक्षकांसमोर आली आहेत. त्यामुळे सध्या जोमात असलेल्या मराठी चित्रपटांनी हा मुहूर्त साधत नवनव्या चित्रपटांचे पोस्टर, टीझर यांचे प्रकाशन करत आपल्या आगमनाची घोषणा केली आहे. दसऱ्याला घोषणा करण्यात आलेले अनेक मराठी चित्रपट दिवाळी आणि त्यानंतरच्या काळात प्रदर्शित होणार आहेत. दसऱ्यापासूनच सुरू झालेला मराठी चित्रपटांच्या प्रदर्शनाचा धमाका दिवाळीत आणि नोव्हेंबरमध्येही दणक्यात वाजणार आहे. मराठीत सध्या एकाकहून एक बहारदार चित्रपटांची निर्मिती होताना दिसत असून नव्या कलाकारांचेही चित्रपट क्षेत्रात पदार्पण होत आहे.

नेहमी सणांच्या दिवशी मोठे हिंदूी चित्रपटच का प्रदर्शित होतात? मराठी सणाला मराठी चित्रपट यायलाच हवेत, अशी घोषणा करत डॉ. अमोल कोल्हे यांनी ‘शिवप्रताप गरुडझेप’ हा चित्रपट प्रदर्शित केला. याशिवाय, श्रेयस तळपदे, मुक्ता बर्वे यांच्या भूमिका असलेला ‘आपडी थापडी’ आणि महेश टिळेकर दिग्दर्शित निमिषा सजयन या दाक्षिणात्य अभिनेत्रीची मुख्य भूमिका असलेला ‘हवाहवाई’ हे तीन मराठी चित्रपट दसरा आणि त्यानंतरच्या आठवडय़ात प्रदर्शित झाले आहेत. आता ऐन दिवाळीत प्रदर्शित होत असलेल्या ‘हर हर महादेव’ या चित्रपटापासून अनेक चांगले मराठी चित्रपट ओळीने दर आठवडय़ाला प्रदर्शित होणार आहेत. ‘गोदावरी’ ते ‘सनी’ जवळपास पंधराहून अधिक मराठी चित्रपट एकीकडे दर आठवडय़ाला नवे मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहेत तर दुसरीकडे आगामी काळात येणाऱ्या चित्रपटांची घोषणा होते आहे. दसऱ्यापासून ते आत्तापर्यंत जवळपास आठ मराठी चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. तर दिवाळीपासून नोव्हेंबरचा पूर्ण महिना पंधराहून अधिक छोटे-मोठे मराठी चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. चित्रपटांच्या प्रदर्शनाचा हा दिवाळी धमाका ‘हर हर महादेव’ या झी स्टुडिओजची निर्मिती असलेल्या अभिजीत देशपांडे दिग्दर्शित चित्रपटाने होणार आहे. पावनिखडीत नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांनी गाजवलेली शौर्याची गाथा नव्या दिग्दर्शकीय मांडणीतून आणि सुबोध भावे, शरद केळकर यांच्यासारख्या कसलेल्या कलाकारांच्या भूमिकेतून पाहायला मिळणार आहे.

दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर निखिल महाजन दिग्दर्शित ‘गोदावरी’ या चित्रपटाचे टीझर प्रकाशित करण्यात आले होते. ‘गोदावरी’ या चित्रपटात अभिनेता जितेंद्र जोशी, विक्रम गोखले, नीना कुळकर्णी, संजय मोने, प्रियदर्शन जाधव, गौरी नलावडे हे कलाकार आहेत. या चित्रपटाने इफ्फी महोत्सवात मानाचे पुरस्कार मिळवलेच, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही मोहोर उमटवणारा ‘गोदावरी’ आता खऱ्या अर्थाने आपल्या प्रेक्षकांसमोर येणार आहे. हा चित्रपट ११ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. त्याआधी २८ ऑक्टोबरला ‘प्रेम प्रथा धुमशान’ हा चित्रपट प्रदर्शित होणार असून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परब या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर आपले नशीब अजमावताना दिसणार आहे.  ‘पल्याड’ हा शैलेश भीमराव दुपारे दिग्दर्शित चित्रपटालाही राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून चांगला प्रतिसाद मिळाला असून त्याचाही टीझर दसऱ्याच्या निमित्ताने प्रकाशित करण्यात आला होता. शशांक शेंडे, देविका दफ्तरदार यांच्यासारख्या नावाजलेल्या कलाकारांच्या भूमिका असलेला हा चित्रपट स्मशानजोगत्या समाजातील मुलांची शिक्षणासाठी सुरू असलेल्या धडपडीचे चित्रण करतो.

हा चित्रपट नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवडय़ात प्रदर्शित होणार आहे. त्याच आठवडय़ात अभिनेता संतोष जुवेकर आणि अभिनेत्री पूर्वा पवार या जोडीचा ‘३६ गुण’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. याशिवाय, अभिनय बेर्डे आणि हिंदूी मालिका-रिअ‍ॅलिटी शोमधून नावारूपाला आलेली अभिनेत्री तेजस्वी प्रकाश यांचा ‘मन कस्तुरी रे’ हा चित्रपटही त्याच आठवडय़ात प्रदर्शित होणार आहे. तर नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवडय़ात ‘गोदावरी’ या चित्रपटासह सिद्धार्थ जाधव, नंदिता पाटकर आणि अभिजीत खांडकेकर यांच्या महत्त्वाच्या भूमिका असलेला ‘बालभारती’, ‘बेभान’ आणि अभिनेते-दिग्दर्शक विजय पाटकर यांचा ‘वऱ्हाडी वाजंत्री’ हे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.  नोव्हेंबरच्या पहिल्या दोन आठवडय़ांतील हिंदूी-मराठी चित्रपटांची भाऊगर्दी टाळून १८ नोव्हेंबरला तरुणाईच्या गळय़ातील ताईत असलेला अभिनेता ललित प्रभाकर याचा ‘सनी’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ‘झिम्मा’च्या यशानंतर दिग्दर्शक हेमंत ढोमे आणि लेखिका इरावती कर्णिक ही जोडी ‘सनी’च्या निमित्ताने एकत्र आली आहे. याशिवाय, ‘जेता’ हा संजय लक्ष्मणराव यादव निर्मित आणि योगेश साहेबराव महाजन दिग्दर्शित चित्रपटही १८ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रकाशित करण्यात आले. दैवी परिस्थितीपुढे हार न मानणाऱ्या तरुणाची कथा सांगणाऱ्या या चित्रपटाचे पोस्टर प्रकाशन वास्तव आयुष्यात दोन्ही हात नसताना पायाने सगळी कामे करत ध्येयवादी जीवन जगणाऱ्या सत्यम लिंगाळे या तरुणाने केले.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi movie release in diwali 2022 zws