सह्याद्री वाहिनीसंदर्भात एक पत्र महाराष्ट्र नवनिर्माण सनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दूरदर्शनच्या अप्पर महासंचालकांना पाठवलं आहे. सह्याद्रीवर मराठी भाषेतील कार्यक्रमच प्रसारित करण्यात यावेत अशी मागणी या पत्राद्वारे राज यांनी केलीय. राज यांचे हे पत्र मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि संजय चित्रे यांनी बुधवारी प्रसारण भवन येथे दूरदर्शनचे अप्पर महासंचालक असलेल्या नीरज अग्रवाल यांना दिलं. याच विषयासंदर्भात मनसेच्या नेत्यांनी पक्षाची भूमिका अग्रवाल यांना समजावून सांगितली. सध्या या वाहिनीवर मराठीबरोबरच इतर भाषांमधील कार्यक्रमही प्रसारित केले जात असून त्यासंदर्भात सर्वसामान्यांच्याही तक्रारी असल्याचं मनसेनं म्हटलंय.

नक्की वाचा >> “७० वर्षांचा असूनही…”, रामदास कदमांनी बोलून दाखवली आदित्य ठाकरेंना ‘साहेब’ म्हणावं लागल्याची खंत; म्हणाले, “दीड वर्ष माझ्या…”

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज ठाकरेंनी अप्पर महासंचालकांना लिहिलेल्या दोन पानी पत्रामध्ये आपली भूमिका सविस्तरपणे मांडली आहे. यामध्ये अगदी सह्याद्री वाहिनीची सुरुवात कधी झाली इथपासून दाक्षिणात्य राज्यांमधील भाषाप्रेमाबद्दलच्या मुद्द्यापर्यंतच्या अनेक मुद्द्यांचा उल्लेख राज यांनी केला आहे. तसेच पत्राच्या शेवटी हिंदी भाषेमधून सह्याद्रीवर प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांऐवजी मराठी भाषेतील कार्यक्रम प्रदर्शित करावेत या मागणीचा नक्की विचार करावा अशी विनंती करतानाच असं झालं नाही तर मनसे हा प्रश्न सोडवण्यासाठी योग्य ती पावलं उचलेल असा इशाराही राज यांनी दिलाय. तसेच या पत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचाही उल्लेख आहे. पत्रात नेमकं काय म्हटलंय पाहूयात…

दूरदर्शनने दिनांक १५ ऑगस्ट १९९४ रोजी महाराष्ट्रासाठी सह्याद्री मराठी प्रादेशिक वाहिनी सुरु केली. त्याचा मूळ उद्देश मराष्ट्राच्या राज्यातील राजभाषेत म्हणजे मराठीत सर्व कार्यक्रमांचे प्रक्षेपण व्हावे हा आहे. मात्र सध्या या वाहिनीवर अनेकदा इतर भाषेतील कार्यक्रम प्रसारित केले जात असल्याचं प्रेक्षकांच्या व आमच्या नजरेस आले आहे. याबाबत सर्वसामान्यांच्या आमच्याकडे तक्रारी आल्या. तसेच याबाबत माहिती अधिकार कायद्यान्वये महिती घेतली असता त्यात ही बाब उघड झाली. तश्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या.

नक्की पाहा >> Photos: ‘फडणवीसांच्या पत्नीनेच…’, ‘कागद लिहून…’, ‘गुजरात, गुवाहाटी, गोव्यात…’, ‘फोडाफोडी करून जे..’; पवारांची फटकेबाजी

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘मन की बात’ हा हिंदी भाषेतील कार्यक्रम सह्याद्री तसेच दूरदर्शनच्या इतर सर्व प्रादेशिक वाहिन्यांवरुन दाखवला जातो. त्याबाबत कुणाचा आक्षेप असण्याचे काहीच कारण नाही कारण ते देशाचे पंतप्रधान आहेत. मात्र ‘कोशिस से कामयाबी तक’, ‘तराने पुराने’ हे हिंदी कार्यक्रम आपल्या मराठी सह्याद्री वाहिनीवर दाखवले जातात तसेच ते पुन:प्रसारीतही केले जातात. त्याचप्रमाणे सह्याद्री वाहिनीवरील मुलाखत किंवा संवादात्मक कार्यक्रमांमध्येही काही वेळा हिंदी वक्ते किंवा हिंदी भाषेतून संवाद साधणाऱ्या व्यक्तींना निमंत्रित केले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. हे निश्चितच मूळ उद्देशाला धरु नाही.

नक्की वाचा >> शरद पवारांच्या घरातील ‘तो’ फोटो शेअर करत निलेश आणि नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंना इशारा; म्हणाले, “अजूनही…”

आम्ही आपणांस एवढंच सांगू इच्छितो की, यशोगाथा असो, सिनेमा गीते असो, पाककृती असो वा इतर कोणताही कार्यक्रम; मराठी भाषेत संवाद साधणारे असंख्य उद्योजक, कलावंत, साहित्यिक, अभिनेते आणि अगदी बल्लवाचार्यही महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे मराठी भाषेत कार्यक्रम प्रसारित करण्यासाठी त्याची कमतरता नाही. याचे भान सह्याद्री वाहिनीसाठी कार्यक्रमांची निर्मिती आणि संबंधित नियोजन करणाऱ्यांनी खबरदारीने घेणे गरजेचे आङे. याबाबात दक्षिण भारतातील कर्नाटक, तामिळनाडू, केरळ या राज्यांतील दूरदर्शनच्या स्थानिक राजभाषाप्रेमी आणि आग्रही अशा प्रादेशिक वाहिन्यांकडून आपण योग्य तो बोध घ्यावा व सह्याद्री वाहिनीवर होणारा इतर भाषांचा प्रादुर्भाव वेळेत रोखावा, हीच एकमेव अपेक्षा.

नक्की पाहा >> Photos: दिल्लीतही शिंदे गट? भाजपा अजून एका ‘मास्टरस्ट्रोक’च्या तयारीत; केसरकर म्हणाले “…तेव्हा उद्धव ठाकरेसुद्धा ऐकतील”

आमच्या मागणीचा आपण जरुर विचार करावा आणि योग्य ती कार्यवाही करावी, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा प्रश्न सोडवण्यासाठी योग्य ती पावलं उचलेल.

हे पत्र २० तारखेला लिहिण्यात आल्याचं पत्रावरील तारखेवरुन स्पष्ट होत आहे. आता यासंदर्भात दूरदर्शन कारवाई करत हिंदी कार्यक्रमांऐवजी मराठी कार्यक्रम प्रदर्शित करणार का हे येणारा काळत सांगेल.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns chief raj thackeray letter to doordarshan over sahyadri vahini demanding only marathi content on channel scsg