प्रसिद्ध दिग्दर्शक मणिरत्नम यांचा बहुप्रतीक्षित बिग बजेट चित्रपट ‘पोन्नियिन सेल्वन’ ३० सप्टेंबरला प्रदर्शित झाला. विक्रम चियान, कार्थी, ऐश्वर्या राय, त्रिशा कृष्णन यांसारखी तगडी स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये बरीच उत्सुकता होती. बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करणार अशी सर्वांना अपेक्षा असलेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी दमदार कमाई करत त्याच दिवशी प्रदर्शित झालेल्या ‘विक्रम वेधा’ चित्रपटाला मात दिली आहे. पहिल्याच दिवशी चित्रपटाने बॉक्स ऑफिस गाजवलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऐश्वर्या राय बच्चन, चियान विक्रम, कार्ति, त्रिशा कृष्णन, जयराम रवि, ऐश्वर्या लक्ष्मी, शोभिता धुलिपाला स्टारर ‘पीएस १’ने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कामगिरी केली आहे. या ऐतिहासिक चित्रपटाबाबत समीक्षकांनीही चांगले रिव्ह्यू दिले आहे. ज्याचा परिणाम बॉक्स ऑफिसवर पाहायला मिळत असल्याचं बोललं जात आहे. हा चित्रपट सध्या चांगलाच गाजतोय.

आणखी वाचा- Vikram Vedha Movie Review : रिमेक असूनही उत्तम अभिनयाची जोड असलेला ‘विक्रम वेधा’

‘पोन्नियिन सेल्वन’ चित्रपट प्रदर्शित होण्याआधी पहिल्या दिवशी हा चित्रपट २५ ते ३० कोटीपर्यंत कमाई करेल असा अंदाज बांधला जात होता. पण चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर हे सर्व अंदाज फोल ठरले. ‘पोन्नियिन सेल्वन’ने ओपनिंग दिवशी अपेक्षेपेक्षा चांगली कमाई करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. संपूर्ण देशभरात सर्व भाषांमध्ये मिळून या चित्रपटाने पहिल्याच दिवशी जवळपास ४० कोटींची कमाई केली आहे. शानदार कमाई करतानाच या चित्रपटाने कमल हासन यांच्या ‘विक्रम’ या चित्रपटाचा विक्रम मोडीत काढला. या चित्रपटाने पहिल्या दिवशी ३७.५ कोटी एवढी कमाई केली होती. याशिवाय ‘पोन्नियिन सेल्वन’ने याच दिवशी प्रदर्शित झालेल्या ‘विक्रम वेधा’लाही मागे टाकलं.

आणखी वाचा- बॉक्स ऑफिसवर ‘विक्रम वेधा’ आणि ‘पोन्नियिन सेल्वन’ येणार आमने-सामने; दिग्दर्शक पुष्कर यांची प्रतिक्रिया चर्चेत

अभिनेता हृतिक रोशन आणि सैफ अली खान यांची मुख्य भूमिका असलेला ‘विक्रम वेधा’ ३० सप्टेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. मोठ्या ब्रेकनंतर हृतिकने मोठ्या पडद्यावर पुनरागमन केलं आहे. दाक्षिणात्य चित्रपटाचा हिंदी रिमेक असलेल्या या चित्रपटाची बरीच चर्चा होती. अर्थात प्रदर्शनानंतर हृतिकच्या अभिनयाचंही जोरदार कौतुक होताना दिसत आहे. पण कमाईच्या बाबतीत हा चित्रपट कुठेतरी कमी पडलेला दिसत आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने केवळ ११.५० कोटी एवढं कलेक्शन केलं आहे. हे कलेक्शन याच दिवशी प्रदर्शित झालेल्या ‘पोन्नियिन सेल्वन’च्या तुलनेत फारच कमी आहे.

आणखी वाचा- अक्षय, आमिरच्या फ्लॉप चित्रपटांची कमाई विक्रम वेधापेक्षा जास्त! पहिल्या दिवशी कमावले ‘इतके’ कोटी

दरम्यान पोन्नियिन सेल्वनबद्दल बोलायचं तर १६ व्या शतकातील चोळ साम्राज्याच्या इतिहासावर आधारित असलेला हा चित्रपटात मणिरत्नम यांच्या बिग बजेट आणि ड्रीम प्रोजेक्टपैकी एक आहे. या चित्रपटातील कलाकारांचं मानधानही कोटीच्या घरात आहे. याशिवाय भव्य सेट्स आणि इतर तांत्रिक गोष्टी लक्षात घेता हा चित्रपट तब्बल ५०० कोटींच्या बिग बजेटमध्ये तयार झाल्याचा दावा काही मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. अर्थात या बजेटनुसार ‘पोन्नियिन सेल्वन’ला कमाईचा बराच लांबचा पल्ला गाठायचा आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ponniyin selvan box office collection know the details about vikram vedha collection mrj
First published on: 01-10-2022 at 12:31 IST