महाराष्ट्रात करोनाचा पुन्हा एकदा हाहा:कार झालेला पाहायला मिळतोय. सगळीकडे तणावाचं वातावरण निर्माण झालंय. करोनामुळे लोकांच्या मनातली दहशत कमी करून सकारात्मक करण्यासाठी अभिनेत्री प्रिया मराठेनी सोशल मिडीयावर एक व्हिडीओ शेअर केलाय. तिचा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी तिचं भरभरून कौतूक केलंय.
विविध मराठी, हिंदी मालिकांमधून घराघरात पोहचलेला देखणा चेहरा आणि अभिनय क्षेत्रात तितक्याच वेगळ्या धाटणीची पात्र साकारणारी अभिनेत्री प्रिया मराठे हिने आपला दमदार अभिनय सादर करत ‘या सुखांनो या’ ते ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ व्हाया ‘पवित्र रिश्ता’ आणि ‘साथ निभाना साथिया’, ‘तु तिथे मी’ असा मराठी आणि हिंदी छोटय़ा पडद्यावरचा प्रवास करत तिनं रूपेही पडद्यावरही आपला जम बसवलाय. सध्या ती सोनी मराठी वाहिनीवरील ‘स्वराज्यजननी जिजामाता’ या मालिकेत एक ऐतिहासिक भूमिका साकारतेय. या मालिकेत प्रिया सावित्रीबाई देशमुख उर्फ रायबागण ही भूमिका साकारतेय.
नुकताच या मालिकेतला एका फाईट सीनच्या शुटींगचा व्हिडीओ तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केलाय. हा व्हिडीओ शेअर करताना तिने सध्याच्या करोना काळात सकारात्मक संदेश देखील दिलाय. या व्हिडीओमध्ये तिच्या फाईट सीनचा संदर्भ करोनाविरोधातल्या लढ्यासोबत जोडत या जीवघेण्या आजाराविरोधात माणूसकी जिंकेल, अशी आशा तिने व्यक्त केलीये. हा व्हिडीओ शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहीलंय, “आपण सर्वच जण या करोनाविरोधात दमदार लढा देतोय…आणि यात आपण जिंकलोय…हे यश वास्तविकतेकडे ही वळवणं शक्य आहे… यासाठी आपल्या सर्वांना खूप शक्ती मिळो…! ”
यापुढे तिने लिहीलंय, ” ज्यांची ज्यांची करोना टेस्ट पॉझिटीव्ह आलीये, ते लवकरात लवकर यातून बाहेर पडू दे”. या व्हिडीओवर तिच्या फॅन्सनी कौतूक केलंय. सध्याच्या वातावरणात सोशल मिडीयावर भावपूर्ण श्रद्धांजलच्या पोस्ट मोठ्या प्रमाणात दिसतात. अशा नकारात्मक वातावरणात अभिनेत्री प्रिया मराठेनी शेअर केलेली ही पोस्ट कित्येक करोना पिडीतांचे मनोबल वाढवणारी ठरतीये.