नाटक, चित्रपट, मालिका, वेब सीरिज अशा विविध माध्यमांतून प्रेक्षकांचे मनोरंजन होताना दिसते. प्रेक्षक म्हणून बघत असलेल्या एखाद्या कलाकृतीमधील एखादे पात्र, काही वाक्ये, कथानक किंवा कलाकारांचा अभिनय कधी कधी आपल्याला इतका आवडतो की, ती कलाकृती आवडती बनते. अशाच लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणजे आई कुठे काय करते ही मालिका. स्टार प्रवाह वाहिनीवर प्रदर्शित होणाऱ्या या मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. या मालिकेत मिलिंद गवळी(Milind Gawali), मधुराणी प्रभुलकर, रूपाली भोसले, अभिषेक देशमुख, निरंजन कुलकर्णी, अपूर्वा गोरे, अर्चना पाटकर, किशोर महाबोले, गौरी कुलकर्णी आणि इतर कलाकार महत्त्वाच्या भूमिकांत दिसले होते. आता एका मुलाखतीदरम्यान मिलिंद गवळींनी या मालिकेत यशची भूमिका साकारणाऱ्या अभिषेक देशमुखबद्दल केलेले वक्तव्य चर्चेत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले मिलिंद गवळी?

‘लोकमत फिल्मी’ने नुकताच ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील सर्व कलाकारांशी संवाद साधला. त्यावेळी अभिषेक देशमुखला मालिकेतील कलाकारांविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्याने म्हटले, “या सगळ्यांनी एकमेकांबरोबर खूप सीन्स केले आहेत आणि आम्हाला खूप मजा आली आहे. प्रत्येक जण पहिल्यांदा सेटवर भेटला तेव्हा कसा होता, काय-काय मजा केली आणि प्रत्येक जण कसा आहे, याचा अनुभव मी घेतला आहे. प्रत्येकाबरोबर माझे छान बॉण्डिंगही आहे. आजीला मी थेट अर्चू, अशी हाक मारतो. आप्पांना परशा म्हणायचो. अर्ची आणि परशा, अशी ती जोडी होती; पण त्यांनी मला ती मुभा दिली होती. ते मला सांगायचे की, माझे मित्र मला किशा म्हणतात. मग कधी कधी आम्ही एकमेकांच्यात इतके वाहवत जायचो की, मी त्यांना किशाही म्हणायचो.”

“अभिमध्ये एक गुण आहे. तो खूप खोडकर आहे. खूप खोडकर म्हणजे अतिखोडकर आहे. आम्हाला भीती वाटायची की, आता मार खातो का काय? पण त्यामुळे सगळ्यांचं सगळ्यांशी बॉण्डिंग व्हायचं. तो एकमेव असा होता की, सगळ्यांच्या मेकअप रूममध्ये जाऊन सगळ्यांना गुड मॉर्निंग करायचा. मला त्याचा तो गुण आवडायचा. प्रत्येकाशी त्याचे चांगले संबंध आहेत”, असे म्हणत मिलिंद गवळी यांनी अभिषेक देशमुखचे कौतुक केले आहे.

याच मुलाखतीमध्ये मिलिंद गवळी यांनी त्यांच्या मालिकेच्या सेटवरून, समृद्धी बंगल्यातून आठवण म्हणून त्यांच्या स्वत:च्या घरी कोणती वस्तू नेली याबद्दल वक्तव्य केले आहे. मिलिंद गवळी यांनी म्हटले, “बंगल्यामध्ये खूप छान छान वस्तू होत्या. आर्ट डायरेक्शन तर अफलातून होतं. प्रत्येकाच्या बेडरूममध्ये वेगळं काहीतरी होतं. पण, मला ते घ्यावंसं वाटलं नाही. कालपासून मी सगळ्यांना सांगतोय की, मी एक वस्तू घेऊन जाणार आहे. आमच्या प्रॉडक्शन मॅनेजर, प्रोड्युसरला सांगा. मी ती अंगणातली तुळस घेतली. मी म्हटलं की, आपल्या अंगणातली तुळस मला द्या. ती बाहेर होती. या सगळ्या प्रवासाची ती साक्षी होती. प्रत्येक माणूस जो आत यायचा, तो सीन करायचा. आप्पा, कांचन आई अशी सगळी पात्रं जिवंत आहेत. मला असं वाटतं की, या सगळ्या आठवणी जिवंत राहणार आहेत. त्या खूप सुखद आठवणी आहेत. आता इथून बाहेर पडल्यानंतर हळूहळू त्यांची आठवण येणार आहे”, असे म्हणत मिलिंद गवळी यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

हेही वाचा: रेखा अमिताभ बच्चन यांच्या ‘कौन बनेगा करोडपती’ शोबद्दल म्हणाल्या, “मला विचार…”

‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील कलाकारांनी ‘आता होऊ द्या धिंगाणा’च्या मंचावर हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. तिथे त्यांचा गौरव करण्यात आला. ‘आता होऊ द्या धिंगाणा’च्या मंचावर बोलताना मिलिंद गवळी भावूक झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्यांनी म्हटलेले, “या क्षणासाठी इतकी वर्षे प्रामाणिकपणे काम करतोय. पण, हा क्षण बघायला आज आई नाहीये.” या मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारलेली मधुराणी प्रभुलकरदेखील भावूक झाल्याचे पाहायला मिळाले होते.

दरम्यान, मालिकेतील इतर कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या भावना व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Milind gawali reveals about co actor abhishek deshmukhs naughty nature says sometimes we all scared aai kuthe kay karte nsp