‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमामुळे मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे यांची जोडी घराघरांत लोकप्रिय झाली. या दोघांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. दोघेही विविध ठिकाणी आपल्या गाण्यांचे कार्यक्रम घेत असतात. मुग्धा-प्रथमेशच्या सुमधूर आवाजाची भुरळ सर्वांनाच पडते. या जोडप्याने गेल्यावर्षीच्या अखेरीस लग्नगाठ बांधली. अतिशय साध्या अन् सुंदर अशा मराठमोळ्या पद्धतीत यांचा विवाहसोहळा पार पडला होता. लग्नानंतर मुग्धा-प्रथमेश सगळे सणवार आनंदाने साजरे करतात. याशिवाय नेहमीच आपल्या मराठी परंपरा जपतात. यामुळे या जोडप्याचं सोशल मीडियावर देखील कौतुक केलं जातं. सध्या गायिकेने शेअर केलेला असाच एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर चर्चेत आला आहे.

मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे यांनी गेल्यावर्षी २१ डिसेंबर रोजी लग्न केलं. या दोघांच्या लग्नाला नुकतेच ६ महिने पूर्ण झाले आहेत. यानिमित्ताने गायिकेने एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये मुग्धा एका पुरातन मंदिरात कीर्तन करत असल्याचं पाहायला मिळत आहे. तर, प्रथमेश तबला वाजवून तिला साथ देत आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे.

हेही वाचा : शत्रुघ्न सिन्हा यांच्या ‘रामायणा’ बंगल्यावर आकर्षक विद्युत रोषणाई; सोनाक्षीच्या हातावर सजली झहीर इक्बालच्या नावाची मेहंदी

मुग्धा आणि प्रथमेशने आरवली येथील आदित्यनारायण मंदिरात कीर्तन केलं होतं. याची खास झलक गायिकेने शेअर केली आहे. लग्नाला सहा महिने पूर्ण झाल्याचं आणि जागतिक संगीत दिनाचं औचित्य साधत मुग्धाने हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी “खरंच अत्यंत सुरेख… गायन… मुग्धा… मंत्रमुग्ध करणारे पद”, “सगळ्या आज कालच्या जोडप्यांनी आदर्श घ्यावा असं सुरेख जोडपं”, “खूप छान मुग्धा प्रथमेश…”, “दोघेही आपली संस्कृती टिकवून ठेवत आहात” अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.

मुग्धा वैशंपायनची पोस्ट

आरवलीत श्री आदित्यनारायणाचं देऊळ आहे. गेली सुमारे १४७ वर्ष आदित्यनारायणाचा उत्सव सुरू आहे. उत्सवाचं माझं हे पहिलंच वर्ष. लळिताच्या कीर्तनाच्या वेळी या पदाने गायनसेवा केली. आज जागतिक संगीत दिनाच्या निमित्ताने हा व्हिडिओ शेअर करते आहे.
तुम्हा सर्वांना जागतिक योग आणि संगीत दिनाच्या निरोगी आणि सुरेल शुभेच्छा!
याशिवाय आमच्या लग्नाला ६ महिने पूर्ण झाले आहेत !
तबल्याच्या साथीला : @prathamesh_laghate_adhikrut
संवादिनी साथ : @classical_vocalist_vg
Video : @paraglaghate

दरम्यान, मुग्धा-प्रथमेशची पहिली भेट ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’च्या मंचावर झाली होती. हा शो संपल्यावर पुढे काही वर्षांनी या दोघांची भेट गाण्यांच्या कार्यक्रमानिमित्त व्हायची. यामुळे दोघांमध्ये मैत्री होऊन पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. गेल्यावर्षी सोशल मीडियावर प्रेमाची कबुली देत मुग्धा-प्रथमेशने डिसेंबर महिन्यात लग्नगाठ बांधली.