Tharla Tar Mag : ‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या प्रतिमाने पुढाकार घेऊन अर्जुन-सायलीचं लग्न लावून दिल्याचा सीक्वेन्स चालू आहे. सुरुवातीला अर्जुन आणि प्रियाचं लग्न होत असताना अचानक लग्नात बॅण्डवाल्याच्या रुपात सायली एन्ट्री घेते. “माझ्या नवऱ्याशी काहीही झालं तरी मीच लग्न करणार” असं सायली प्रियाला ठणकावून सांगते. यावेळी सायलीला खंबीरपणे साथ देते ती प्रतिमा… अर्जुन सुद्धा बायकोच्या बाजूने उभा राहून प्रियाला खडेबोल सुनावतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सायली लग्नाच्या मंडपात आल्यावर प्रतिमा पूर्णा आजीला वचन मागे घ्यायला भाग पाडते. या सगळ्या गोष्टी पाहून प्रिया प्रचंड संतापते आणि सायलीला उलटं बोलू लागते. इतकंच नव्हे तर, प्रिया सायलीबद्दल भर मांडवात आक्षेपार्ह शब्द वापरते. प्रियाचं हे रुप पाहून प्रतिमा संतापून तिला कानाखाली वाजवते. तसेच यापुढे, “सायलीबद्दल एकही अपशब्द बोलू नकोस, असं करून तू स्वत:ची लायकी दाखवत आहेस” असंही ती प्रियाला बजावते. “सायली देखील माझ्या मुलीसारखी आहे, तिने माझ्यासाठी जे काही केलंय ते खूप मोठं आहे” असं बोलून प्रतिमा सर्वांची समजूत काढते आणि अर्जुन-सायलीचं लग्न लावून देते.

लेकीचं कन्यादान करण्यासाठी मधुभाऊ यावेळी मांडवात येतात. आपल्या लेकीचा हात ते अर्जुनच्या हाती सुपूर्द करतात. मिसेस सायलीशी पुन्हा एकदा लग्न होणार… या विचाराने अर्जुन खूपच सुखावतो. तो गुरुजींना पुन्हा एकदा नव्याने सगळे विधी सुरू करा असं सांगतो. मालिकेत खरा ट्विस्ट अर्जुन-सायलीच्या लग्नानंतर येणार आहे.

अर्जुन आणि सायली लग्नानंतर सुभेदारांच्या घरी जातात. याठिकाणी सुनेचं स्वागत न करता दोघांचीही हकालपट्टी करण्याची तयारी सुरू असते. अर्जुन-सायली गाडीतून उतरून सुभेदारांच्या पूर्णानिवासच्या प्रवेशद्वाराजवळ उभे राहतात. यावेळी प्रताप दोघांनाही घराबाहेर काढतो. सायलीचं सामान घराबाहेर फेकलं जातं. सायली आणि अर्जुनचं लग्न सुभेदार कुटुंबीय स्वीकारत नाहीत.

“आम्हाला या मुलीशी कोणताही संबंध जोडायचा नाहीये. हा निर्णय आम्ही सर्वांनी मिळून घेतला आहे. सायलीला या घरात प्रवेश मिळणार नाही.” असं प्रताप अर्जुनला सांगतो. वडिलांचे हे शब्द ऐकताच अर्जुन आणखी वाद न वाढवता आपल्या पत्नीसह घराबाहेर पडतो.

दरम्यान, आता सायली-अर्जुन बेघर झाल्यावर नव्याने आपला संसार सुरू करणार की, सुभेदारांच्या घरात त्यांना रिएन्ट्री मिळणार या गोष्टी मालिकेच्या आगामी भागात प्रेक्षकांना पाहायला मिळतील.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tharla tar mag arjun and sayali expelled from subhedar house watch new promo sva 00