गेल्या मार्च महिन्यात अभिनेता विशाल निकम व अभिनेत्री पूजा बिरारीच्या नव्या मालिकेची घोषणा ‘स्टार प्रवाह’नं केली होती. ‘येड लागलं प्रेमाचं’ असं नव्या मालिकेचं नाव असून १७ मार्चला या मालिकेचा पहिला प्रोमो समोर आला होता. तेव्हापासून ‘येड लागलं प्रेमाचं’ नवी मालिका कधीपासून सुरू होणार? याकडे सर्वाचं लक्ष लागून राहिलं होतं. अखेर आज मालिकेची सुरू होण्याची तारीख आणि वेळ जाहीर करण्यात आली आहे. एका लोकप्रिय मालिकेची जागा ‘येड लागलं प्रेमाचं’ मालिका घेणार आहे.

‘येड लागलं प्रेमाचं’ ही मालिका प्रेमातल्या वेडपणाची साक्ष देणारी असणार आहे. महाराष्ट्राचं कुलदैवत अशी ओळख असणाऱ्या विठुरायाच्या पंढरपुर नगरीत या मालिकेची गोष्ट घडणार आहे. राया व मंजिरी या मालिकेतील प्रमुख पात्र आहेत. अभिनेता विशाल निकम रायाच्या भूमिकेत तर मंजिरीच्या भूमिकेत पूजा बिरारी पाहायला मिळणार आहेत. एकमेकांचा तिरस्कार करणाऱ्या राया व मंजिरीचा प्रेमात पडण्यापर्यंतचा प्रवास म्हणजे ‘येड लागलं प्रेमाचं’ ही मालिका आहे.

हेही वाचा – “जहांगीर…”, चिन्मय मांडलेकरच्या लेकाच्या नावावरील ट्रोलिंगवर सुप्रिया पिळगावकरांची मार्मिक पोस्ट, म्हणाल्या…

‘स्टार प्रवाह’वरील ‘येड लागलं प्रेमाचं’ ही नवी मालिका २७ मेपासून सुरू होणार आहे. सोमवार ते शनिवारी रात्री १०.३० वाजता ही नवी मालिका प्रसारित होणार आहे. सध्या रात्री १०.३० ‘स्टार प्रवाह’वर ‘अबोली’ ही लोकप्रिय मालिका सुरू आहे. त्यामुळे आता २७ मेपासून ‘अबोली’ची जागा ‘येड लागलं प्रेमाचं’ मालिका घेणार आहे. पण ‘अबोली’ मालिका बंद होणार नसून नव्या वेळेत प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

हेही वाचा – ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर लवकरच येतेय आणखी एक नवी मालिका, आर्या आंबेकर व नचिकेत लेले यांनी गायलं शीर्षकगीत

दरम्यान, ‘येड लागलं प्रेमाचं’ या नव्या मालिकेत विशाल निकम व पूजा बिरारीसह ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुळकर्णी, अतिशा नाईक पाहायला मिळणार आहे. तसंच या मालिकेत अजून कोणते कलाकार झळकणार? हे गुलदस्त्यात आहे.