शिवसेना नेते व राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर सडकून टीका केली. तसेच बंडखोर आमदारांनी महाराष्ट्रात येऊन विधानसभेत माझ्यासमोर बसावं, असं आव्हान दिलंय. बंडखोर समोरासमोर बसल्यावर मी हाताची घडी, तोंडावर बोट ठेवेल आणि डोळ्यात डोळे घालून फक्त आम्ही काय कमी केलं? एवढाच सवाल करेल, असं मत व्यक्त केलं. यावेळी आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेतील बंडखोरीनंतर शिवसेनेचा एक आमदार वर्षा बंगल्यावर येऊन हातात हात घेऊन रडल्याची आठवणही सांगितली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आदित्य ठाकरे म्हणाले, “अनेकदा प्रसंग वेगवेगळे येत असतात. कधी ईडीची फाईल असेल, कधी वेगळं कारण असेल. २-४ लोकांनी फोन करून सांगितलं की, आम्ही लाचार झालोय, आम्ही तुमचेच आहोत. काही गोष्टींचं दुःख आहे. प्रकाश सुर्वे सारखा माणूस तिथं गेला असेल यावर माझा विश्वास बसत नाही. मनाने तरी ते तिथं नसतील. तो माणूस माझ्या कार्यालयात रोज बसायचा, रस्त्याचं, फुटपाथचं, एसआरए, वनविभाग कशाचंही काम असो त्यांचं प्रत्येक काम मी केलं. फोन करून, मेसेज करून सांगायचे मी लगेच काम झालं म्हणून समजा सांगायचो.”

“हातात हात घेऊन रडलेला माणूस जाऊ कसा शकतो?”

“दिलीप मामा लांडे वर्षावर माझा हात हातात घेऊन रडले आहेत. हातात हात घेऊन रडलेला माणूस जाऊ कसा शकतो?” असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला. “परवा १०० लोकांना चावी वाटप करायच्या होत्या. मी म्हटलं लांडे मामा दोन दिवस थांबा, आपण काम करून टाकू. मिठी नदीचं कामही केलं,” असंही आदित्य ठाकरे यांनी नमूद केलं.

यावेळी आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदार संदीपानराव भुमरे यांच्यावरही सडकून टीका केली. तसेच त्यांना प्रत्येक गोष्टीत मदत करूनही त्यांनी बंडखोरी केल्याचा मुद्दा मांडला. ते म्हणाले, “संदीपानराव भामरे कसे मंत्री झाले तुम्हाला माहिती आहे का? ते पाचवेळ आमदार होते. आजही ते माझं भाषण ऐकत असतील तर त्यांनी सांगावं मी खोटं बोलत आहे.”

पाहा व्हिडीओ –

“मी जन आशीर्वाद यात्रेत त्यांच्या मतदारसंघात गेलो होतो. तेव्हा एका शेतकऱ्याने भुमरे पाचवेळा आमदार झालेत मंत्री बनवा, दुसरे म्हटले राज्यमंत्री नाही, कॅबिनेट मंत्रीपद हवं, अशी मागणी केली. मी म्हटलं हो काम झालं, मी उद्धव ठाकरे यांना भुमरे यांना मंत्री करण्यासाठी सांगतो. तुम्ही त्यांना निवडून द्या. एकजण खात्याविषयी बोलू लागला तर मी तो विषय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा असल्याचं सांगितलं,” असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.

हेही वाचा : “एक मित्र म्हणाला तुमचं आडनाव काही दिवस ठोकरे करा, मी म्हटलं…”; आदित्य ठाकरेंची बंडखोरांवर आक्रमक फटकेबाजी

“आज हे हिंदुत्वाच्या पोस्ट टाकत आहेत. अडीच वर्ष हिंदुत्वावर चकार शब्द काढला नाही. हिंदुत्वाचा ह देखील बोलले नव्हते. प्रत्येकवेळी माझ्यासमोर यायचे, दादा पैसे मिळत नाही, निधी आला नाही, हे काम करा म्हणायचे. मी मागच्याच वेळी कुणाला किती निधी दिला त्याचा आढावा घेतला. शिवसेनेच्या आमदारांपैकी सर्वाधिक निधी मी संदीपान भुमरे यांना दिलाय. मला धक्का याचा बसला आहे की हक्काने हे काम करा, ते काम करा सांगणारे बंडखोरी करत आहेत,” असंही आदित्य ठाकरे यांनी नमूद केलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aaditya thackeray comment on rebel shivsena mla dilip lande varsha bungalow incident pbs
First published on: 26-06-2022 at 16:43 IST