“जेव्हा जेव्हा आमच्या छत्रपतींना सन्मान देण्याची वेळ येते त्या प्रत्येक वेळी शिवसेनेने…”, आशिष शेलार यांचा हल्लाबोल

भाजपा आमदार आशिष शेलार यांनी संभाजीराजे छत्रपती यांना राज्यसभा निवडणुकीत पाठिंबा देण्यावरून शिवसेनेवर हल्लाबोल केलाय.

Ashish Shelar Sambhajiraje Chhatrapati Uddhav Thackeray

भाजपा आमदार आशिष शेलार यांनी संभाजीराजे छत्रपती यांना राज्यसभा निवडणुकीत पाठिंबा देण्यावरून शिवसेनेवर हल्लाबोल केलाय. “जेव्हा जेव्हा आमच्या छत्रपतींना सन्मान देण्याची वेळ येते तेव्हा प्रत्येक वेळी शिवसेनेने त्यांचा अपमान केला,” असा गंभीर आरोप आशिष शेलार यांनी केला. शेलार यांनी पत्रकार परिषदेतील आपला व्हिडीओ ट्वीट करत शिवसेनेला लक्ष्य केलंय.

आशिष शेलार म्हणाले, “एका गोष्टीचा खेद वाटतो ज्यावेळी आमच्या छत्रपतींना सन्मान देण्याची वेळ येते त्या त्यावेळी शिवसेनेने त्यांचा अपमान किंवा अनादर केलाय. त्याचं काय कारण आहे हे मला माहिती नाही. छत्रपतींच्या घराण्याचा जेवढा अनादर आणि अपमान शिवसेनेने केला तेवढा कोणीच केलेला नाही. म्हणून आपण बघितलं असेल कधी विश्वविख्यात प्रवक्ते छत्रपतींच्या वंशजांच्या घराण्याचे पुरावे मागतात.”

हेही वाचा : शिवसेनेकडून संभाजीराजेंना राज्यसभेची उमेदवारी नाहीच; संजय पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब

“जेव्हा छत्रपतींना सन्मान देण्याची वेळ येते त्यावेळी आपल्या पक्षाची अट घातली जाते हे सुद्धा चित्र आपण पाहिले आहे. छत्रपतींच्या सन्मानाचा विषय समोर आला तेव्हा भारतीय जनता पक्षाने एकमुखाने छत्रपतींना राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणून राज्यसभेत पाठवलं. राष्ट्रपतींनी त्यांना राज्यसभेत पाठवलं. स्वतः देशाचे पंतप्रधान मोदींनी त्यांचा सन्मान केला हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं,” असं आशिष शेलार यांनी सांगितलं.

“मावळे असतात म्हणून राजे”

दरम्यान, शिवसेनेकडून राज्यसभा उमेदवार म्हणून संजय पवार यांची घोषणा करण्यात आली. यावर संजय राऊत म्हणाले, “संजय पवार यांचं नाव अंतिम झालं आहे. संजय पवार शिवसेनेचे मावळे असून उद्धव ठाकरेंनी या मावळ्याला उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. अधिकृत घोषणा लवकरच केली जाईल. दोन्ही जागा शिवसेनेच्या आहेत, दोन्ही जागांवर शिवसेना लढेल आणि उमेदवार विजयी होतील”.

“मावळे असतात म्हणून राजे”

“कोल्हापूरचे संजय पवार हे अनेक वर्ष जिल्हाप्रमुख आहेत, कडवट शिवसैनिक आहेत. ते पक्के मावळे असून मावळे असतात म्हणून राजे असतात. पक्षनेते, पदाधिकारी हे मावळ्यांच्या जोरावर उभे असतात,” असंही संजय राऊत यांनी सांगितलं.

“कुटुंबाविषयी, गादीविषयी, छत्रपती शिवाजी महाराजांविषयी कायम आदर”

संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्यांशी आपलं बोलणं झालं असून आदर ठेवला जाईल अशी अपेक्षा व्यक्त केल्यासंबंधी विचारलं असता ते म्हणाले की, “नक्कीच सन्मान ठेवत आहोत. त्यांच्या कुटुंबाविषयी, गादीविषयी, छत्रपती शिवाजी महाराजांविषयी कायम आदर आहे. त्यासाठीच तर आम्ही सहाव्या जागेसाठी शिवसेनेचे उमेदवार व्हा असा प्रस्ताव ठेवला. त्यांना राज्यसभेवर जायचं आहे, अपक्ष लढायचं आहे आणि त्यासाठी ४२ मतांची गरज आहे. जर कोणाकडे ४२ मतं असतील तर तो राज्यसभेवर निवडून येऊ शकतो. संभाजीराजे अपक्ष लढणार असतील तर त्यांच्याकडे मतांची काय योजना आहे माहिती नाही. पण प्रस्ताव आला तेव्हा गादी, छत्रपतींच्या वंशजाचा सन्मान लक्षात घेता शिवसेना उमेदवारी देईल, पक्षात प्रवेश करा असं सांगितलं होतं”.

संभाजीराजेंच्या समर्थकांकडून होणाऱ्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले की, “आम्ही कोणाच्या प्रश्नांना उत्तर देण्यास बांधील नाही. त्यांना शिवसेनेचा इतिहास माहिती नसावा. एकनाथ ठाकूर हे कडवट शिवसैनिक होते. ज्या सामनाच्या इमारतीखाली आपण बोलत आहोत त्यातही त्यांचा वाटा होता. प्रियंका चतुर्वेदीदेखील शिवसेनेच्याच उमेदवार आहेत. प्रितीश नंदी हेदेखील शिवसेनेचे उमेदवार होते”.

“महाराजांना पक्षाचं वावडं असू नये”

“शाहू महाराजसुद्धा पक्षाच्या तिकीटावर लोकसभा लढले आहेत. मालोजीराव भोसले हेदेखील पक्षाच्या तिकीटावर उमेदवारी घेऊन लढले आहेत. स्वत: संभाजीराजे भोसले राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर कोल्हापुरातून निवडणूक लढले आहेत. त्यामुळे राजांना, महाराजांना पक्षाचं वावडं असू नये. देशभरातील अनेक राजघराण्याचे लोक आजही अनेक पक्षांच्या तिकीटावर राज्यसभेत, लोकसभेत आले आहेत,” असं संजय राऊत यांनी सांगितलं.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ashish shelar criticize shivsena over candidature of rajya sabha election pbs

Next Story
“काकूचे मंगळसूत्र काढायचं नाही”; काकांच्या अंत्यविधीला रुपाली चाकणकरांनी मोडली प्रथा
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी