मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपला अयोध्या दौरा स्थगित केला. यानंतर मुंबईतील काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी राज ठाकरेंवर हल्लाबोल केलाय. अयोध्या दौरा स्थगित झाल्यानंतर मला भीती वाटते की राज ठाकरे आता हिंदुत्वाचा मुद्दाच सोडून देतात की काय असं म्हणत संजय निरुपम यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. तसेच राज ठाकरे यांना अयोध्येला जाण्याआधी उत्तर भारतीयांची माफी मागावीच लागेल, असं मतही व्यक्त केलं. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संजय निरुपम म्हणाले, “आता राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा स्थगित केला आहे तर मला भीती आहे की ते आता हिंदुत्वाचा मुद्दा सोडून तर देत नाही ना. कारण ते लाऊडस्पिकरच्या मदतीने जो हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन आले होते ते हिंदुत्व नाहीच. तो विनाकारण दोन समाजात भांडण लावण्याचा कार्यक्रम होता. कोणाच्या तरी सांगण्यावरून राज ठाकरे हे भांडण लावत होते. हिंदुत्वाचा मुद्दा घेत असतील तर तो त्यांचा निर्णय आहे. मात्र, त्यांनी मुलभूत प्रश्नांवर काम केलं पाहिजे. भांडणे लावून, दंगे करून हिंदुत्वाचा विचार पुढे आणू नये.”

“माझा राज ठाकरे यांच्या अयोध्येला जाण्याला विरोध नव्हता, कोणालाही…”

“अयोध्येचा दौरा स्थगित झाल्यानंतर राज ठाकरे आता हिंदुत्वाचा मुद्दाच सोडून देतात की काय असं वाटतंय. माझा त्यांनी अयोध्येला जाण्याला विरोध नव्हता. कोणालाही अयोध्येला जाण्याचा, भगवान श्रीरामांच्या चरणी नतमस्तक होण्याचा अधिकार आहे. सर्व हिंदू आणि गैरहिंदूंना देखील अयोध्येला जाण्याचा अधिकार आहे. राज ठाकरे उत्तर भारतात जात आहेत तर आधी त्यांनी उत्तर भारतीयांना दिलेल्या त्रासाबद्दल माफी मागावी अशी मागणी मी केली होती. आजही मी ती मागणी करतो. त्यांना माफी मागावी लागेल आणि मागायला हवी,” असं मत संजय निरुपम यांनी व्यक्त केलं.

“राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी”

पत्रकारांशी बोलताना सुरुवातीला संजय निरुपम म्हणाले, “मी १५-२० दिवसांपूर्वीच म्हटलं होतं की, राज ठाकरे हिंदुत्वाचा मुद्दा उचलत आहेत, अयोध्येला जात आहेत तर त्यांनी नक्की जावं. मात्र, त्याआधी राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी, अशी मागणी मी केली होती. यानंतर देशभरातून अशी मागणी सुरू झाली. मुंबईतही केवळ काँग्रेस नाही, तर वेगवेगळ्या पक्षांकडून ही मागणी झाली.”

हेही वाचा : भाजपा खासदाराच्या विरोधानंतर राज ठाकरेंचा अयोद्धा दौरा स्थगित? किरीट सोमय्यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

“आपला पक्ष प्रसिद्धीत आणण्यासाठी विनाकारण गरीब उत्तर भारतीयांवर हल्ले”

“राज ठाकरे यांनी माफी मागावी ही मागणी होत आहे कारण त्यांनी आपला पक्ष प्रसिद्धीत आणण्यासाठी मुंबईत विनाकारण गरीब उत्तर भारतीयांवर हल्ले केले. त्यांनी फेरीवाले, रिक्षावाले, ऑटोवाले, टॅक्सीवाले यांना मारहाण केली आणि त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. ते दुःख नक्कीच आजही मुंबईतील आणि संपूर्ण उत्तर भारतीयांच्या मनात आहे. अशावेळी ते उत्तर भारतात जात आहेत तर ही मागणी होणारच होती,” असंही संजय निरुपम यांनी नमूद केलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress leader sanjay nirupam comment on raj thackeray ayodhya visit pbs
First published on: 20-05-2022 at 16:40 IST