मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या विधानाचे राज्यात गुरुवारीही पडसाद उमटले. भाजप आणि शिंदे गटाने रस्त्यावर उतरून राहुल यांचा निषेध करत ठाकरे गटाला घेरण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राहुल यांच्या विधानाशी सहमत नसल्याचे स्पष्ट करत केंद्रात भाजपची सत्ता असतानाही सावरकर यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च पुरस्कार का देण्यात आला नाही, असा सवाल केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

 सावरकर यांनी इंग्रजांना मदत केली होती, असे विधान राहुल गांधी यांनी मंगळवारी ‘भारत जोडो’ यात्रेदरम्यान एका सभेत केले होते. त्यावरून भाजप आणि शिंदे गटाने महाविकास आघाडीत सहभागी असलेल्या शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. त्यास उद्धव ठाकरे यांनी भाजपसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला लक्ष्य केले. संघाला १०० वर्षे पूर्ण होत असली तरी स्वातंत्र्यलढय़ात त्यांचे योगदान काय? असा सवाल ठाकरे यांनी केला. संघाचा स्वातंत्र्यलढय़ात सहभाग नसून, हिंदूंना वाचविण्यासाठी निजामाविरोधातही ते कधी लढले नाहीत. त्यामुळे संघ ही ज्यांची मातृसंस्था आहे, त्यांच्या पिल्लांनी आम्हाला सावरकरांविषयी शिकवू नये, असे ठाकरे म्हणाले. सावरकरांबद्दल आमच्या मनात प्रेम व नितांत आदर आहे. भारतरत्न पुरस्कार देण्याचे सर्वाधिकार पंतप्रधानांना असताना भाजपला सत्तेत येऊन आठ वर्षे होऊनही सावरकरांना हा सर्वोच्च पुरस्कार का जाहीर करण्यात आला नाही, असा सवाल ठाकरे यांनी केला. वंदे मातरम्, भारत माता की जय म्हणण्यास नकार देणाऱ्या मेहबुबा मुफ्ती यांच्याशी तुम्हाला युती कशी चालते, याकडेही उद्धव ठाकरे यांनी लक्ष वेधले.

सावरकर, बाळासाहेबांना भारतरत्न पुरस्कार द्या

स्वा. सावरकरांबद्दल ढोंगी प्रेम न दाखवता त्यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा, ही शिवसेनेची गेल्या १५ वर्षांपासून मागणी असल्याचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले. सावरकर हे हिंदूहृदयसम्राट होते आणि त्यांच्यानंतर बाळासाहेब ठाकरे हेच हिंदूहृदयसम्राट आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी तुम्हाला इतकेच प्रेम असेल, तर त्यांनाही भारतरत्न पुरस्कार द्यावा, अशी मागणी राऊत यांनी केली.

राहुल यांनी स्वत:च्या आजीचे पत्र वाचलेले नाही : शेलार

भारताचे सुपूत्र स्वा. सावरकर यांचे युध्द अतिशय धाडसी होते आणि ब्रिटिश सरकारविरोधातील त्यांच्या कार्याची नोंद इतिहासात होईल, असे गौरवोद्गार माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी स्वा. सावरकरांविषयी लिहिलेल्या पत्रात काढले होते. राहुल गांधी यांनी पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्या लिखाणाचा अभ्यास केलेला नाही. आता केरळमधून निवडून आल्यानंतर हिरवा झेंडा आणि हिरव्या झेंडय़ाची मते एवढय़ापुरताच त्यांनी अभ्यास केलेला दिसत असून त्यांचे स्वा. सावरकरांविषयीचे वक्तव्य बेअक्कलपणाचे आहे, अशी टीका मुंबई भाजपचे अध्यक्ष अ‍ॅड. आशीष शेलार यांनी केली.  स्वा. सावरकरांविषयी उद्धव ठाकरे यांनी तरी बोटचेपी भूमिका घेऊ नये, असे आम्हाला वाटत होते. पण, सत्तेसाठी माती खाल्लेल्यांनी स्वत:च्या वडिलांच्याही विचारांनाही तिलांजली दिली आहे, अशी टीका शेलार यांनी केली. ‘‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने स्वातंत्र्यलढय़ात सक्रिय सहभाग घेतला होता. महात्मा गांधींनी त्यावेळी संघ कार्यक्रमात हजेरी लावली होती. सरसंघचालक केशव बळीराम हेडगेवार हे स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होते. उद्धव ठाकरे या इतिहासापासून अनभिज्ञ आहेत’’, असे शेलार म्हणाले. 

मनसेचा इशारा 

स्वा. सावरकर यांच्याबद्दल राहुल गांधी यांनी केलेल्या विधानाचा मनसेने निषेध केला. तसेच राहुल गांधी यांची शुक्रवारी शेगावमधील जाहीर सभा होऊ देणार नाही, असा इशारा मनसेने दिला आहे. दरम्यान, भाजप आणि ‘बाळासाहेबांची शिवसेने’ने राहुल गांधी यांच्या वक्तव्याविरोधात राज्यात अनेक ठिकाणी आंदोलने केली. अनेक ठिकाणी राहुल गांधी यांच्या प्रतिमांना जोडे मारण्यात आले आणि काळे फासण्यात आले. अनेक ठिकाणी त्यांच्या प्रतिमा जाळण्यात आल्या. ठाणे, कल्याण-डोंबिवली, पुणे व अन्यत्र ही आंदोलने झाली.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निषेध

राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निषेध करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निषेधाचा प्रस्ताव मांडला आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य मंत्र्यांनी त्यास अनुमोदन दिले. स्वा. सावरकरांच्या भूमीत त्यांचा अपमान होऊ देणार नाही. ही काँग्रेस नेत्यांची परंपराच असून, पंडित नेहरु यांनीही आपल्या पुस्तकात वादग्रस्त लिखाण केले होते, असे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. राहुल गांधी यांची यात्रा थांबविण्याचा प्रश्न नसल्याचे त्यांनी नमूद केले.

स्वा. सावरकरांबद्दल आमच्या मनात प्रेम आणि नितांत आदर आहे. त्यामुळे राहुल गांधींच्या विधानाशी आम्ही सहमत नाही. मात्र, भाजप सत्तेत येऊन आठ वर्षे होऊनही सावरकरांना भारतरत्न पुरस्कार का जाहीर करण्यात आला नाही?

-उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, शिवसेना

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Controversy criticism savarkar uddhav thackeray disagrees rahul gandhi statement bjp shinde group aggressive ysh