राज्यातील बाधितांच्या संख्येत मात्र वाढ

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : मुंबई शहरातील करोना रुग्णसंख्या घटत असली तरी उर्वरित राज्यात मात्र बाधितांचा आकडा वाढत असल्याचे चित्र आहे.   मुंबईत गेल्या २४ तासांत ५,००८ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर उर्वरित राज्यात ४८,२७० बाधित आढळले. मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात रुग्णसंख्या हळूहळू कमी होत असली तरी पुणे आणि राज्याच्या अन्य भागांत ती वाढत आहे. राज्यात दिवसभरात ४२,३९१ रुग्ण करोनामुक्त झाले असून उपचाराधीन रुग्णांची संख्या २,६४,३८८ इतकी आहे.

मुंबईत एका दिवसात दुपटीहून अधिक म्हणजेच १३ हजाराच्या आसपास रुग्ण करोनामुक्त झाले. त्यामुळे शहरातील उपचाराधीन रुग्णांची संख्या १४ हजारांवर आली आहे. मृतांची संख्या मात्र वाढली असून शुक्रवारी दिवसभरात १२ रुग्ण दगावले. चाचण्यांच्या तुलनेत मुंबईतील बाधितांचे प्रमाण १० टक्के झाले आहे.  मुंबईत शुक्रवारी दिवसभरात आढळलेल्या रुग्णांपैकी ८४ टक्के म्हणजेच ४,२०७ रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत. तर केवळ ४२० रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले. तर ८८ रुग्णांना प्राणवायू द्यावा लागला. सध्या मुंबई पालिकेच्या करोना उपचार केंद्रात ४,५७१ रुग्ण दाखल असून १२.१ टक्के खाटा व्यापलेल्या आहेत, तर एका दिवसात तब्बल १२,९१३ रुग्ण करोनामुक्त झाले. मुंबईतील मृतांची संख्या मात्र गेल्या काही दिवसांपासून वाढू लागली आहे. शुक्रवारी १२ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात नऊ पुरुष व तीन महिला होत्या. आठ रुग्णांचे वय ६० वर्षांवर होते.

राज्यात गेल्या २४ तासांत  पनवेल ७९०, रायगड ८६६, नाशिक १८६६, नगर ९०५, पुणे ३०५२, पुणे शहर ८४६४, पिंपरी चिंचवड ४९४३, सातारा १५५९,औरंगाबाद ५७९ इतकी नवीन रुग्णांची नोंद झाली.

ठाणे जिल्ह्यात ३००६ बाधित

ठाणे : ठाणे जिल्ह्यात शुक्रवारी ३००६ करोना रुग्ण आढळले, तर दहा रुग्णांचा मृत्यू झाला. नव्या रुग्णांपैकी नवी मुंबई १०८०, ठाणे ८९०, कल्याण डोंबिवली ३९२, मिरा-भाईंदर १९३, ठाणे ग्रामीण १७४, उल्हासनगर १०८, अंबरनाथ ७८ भिवंडीमध्ये ५१ आणि बदलापूरमधील ४० रुग्णांचा समावेश आहे. मृतांमध्ये कल्याण डोंबिवली चार, नवी मुंबई दोन, ठाणे, अंबरनाथ, मिरा-भाईंदर आणि ठाणे ग्रामीण क्षेत्रातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

ओमायक्रॉनचे १४४ रुग्ण

राज्यात ओमायक्रॉनचे १४४ रुग्ण आढळले, तर एकूण रुग्णसंख्या २,३४३ झाली. त्यापैकी १,१७१ रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी नकारात्मक आल्यावर त्यांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहे.

देशात… गेल्या २४ तासांत देशभरात ३,४७,२५४ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर ७०३ जणांचा मृत्यू झाला. राजधानी दिल्लीत शुक्रवारी १०,७५६ बाधित आढळले. तेथील रुग्णसंख्येतही घट होत असल्याचे निदर्शनास येत आहे. दिल्लीत गुरुवारी १२,३०६ रुग्ण आढळले होते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Corona virus infection corona positive patient in mumbai omicron patient akp
First published on: 22-01-2022 at 01:22 IST