Mumbai Water Taxi Service: देशातील पहिली वॉटर टॅक्सी मुंबईत सुरू होत आहे. मुंबईत ज्या सुविधांची सुरुवात होते त्या सुविधांचा प्रसार पुढे देशभर होतो, त्याचे अनुकरण देशभर केले जाते. देशातील पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे अशी धावली होती. त्यानंतर देशभर रेल्वेचे जाळे विणले गेले. महाराष्ट्राच्या, देशाच्या विकासासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य महाराष्ट्र देईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरूवारी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राजकारण हे राजकारणाच्या जागी असते. जनतेच्या सेवेला प्राधान्य देणे आवश्यक असते. त्यामुळे महाराष्ट्र नेहमी देशाच्या विकासासाठी केंद्राच्या सोबत असेल असेही मुख्यमंत्री ठाकरे यावेळी सांगितले.

लोकसत्ता विश्लेषण : १५ मिनिटांत मुंबई ते नवी मुंबई प्रवास; नवीन वर्षात सुरु होणारी वॉटर टॅक्सी सेवा कशी असेल? जाणून घ्या…

देशातील पहिल्या वॉटर टॅक्सी सेवेचे आणि बेलापूर जेट्टीचे उद्घाटन गुरुवारी झाले, यावेळी ते बोलत होते. वॉटर टॅक्सीची सेवा आज, शुक्रवारपासून सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होणार आहे.

मुंबई ते नवी मुंबई अंतर केवळ ३० मिनिटांत पार करता यावे आणि रस्ते तसेच रेल्वेवरील वाहतुकीचा ताण कमी व्हावा यासाठी वॉटर टॅक्सीचा, जलद जलवाहतुकीची पर्याय पुढे आणण्यात आला. हा प्रकल्प पूर्ण करून गुरुवारी या सेवेचे उद्घाटन करण्यात आले. केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते वॉटर टॅक्सी सेवेचे ई लोकार्पण करण्यात आले. मुख्यमंत्र्यांनीही दूरचित्रसंवादाद्वारे बेलापूर जेट्टीचे उद्घाटन केले. 

केंद्रीय मंत्री सोनोवाल यांनी वॉटर टॅक्सी आणि बेलापूर जेट्टी प्रकल्पाच्या कामाचे कौतुक करून येत्या काळात एमएमआर आणि महाराष्ट्रात वॉटर टॅक्सीसह अन्य जलवाहतुकीचे प्रकल्प राबविले जातील अशी माहिती दिली. महाराष्ट्रासाठी १.५ लाख कोटींचे १३१ प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. यात सागरमाला कार्यक्रमांतर्गत ४६ प्रकल्प असून यासाठी २७८ कोटी रुपयांचा निधी देण्यात आल्याचेही ते यावेळी म्हणाले.

जलवाहतुकीला चालना : अजित पवार</p>

जलवाहतूक ही सर्वात स्वस्त, पर्यावरणपूरक अशी वाहतूक व्यवस्था आहे. त्यामुळे मुंबईकरांना आणि नवी मुंबईकरांना उपयोगी ठरतील असे जलवाहतुकीचे प्रकल्प येत्या काळात सुरू करावे लागतील. मुंबई आणि एमएमआरला समुद्र, खाडी लाभली आहे. त्यामुळे जलवाहतूकीला चालना देण्याची गरज असल्याचे मत यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.

सेवेची वैशिष्टय़े

० बेलापूर येथून प्रत्येकी १० ते ३० प्रवासी क्षमता असलेल्या सात स्पीडबोटी

० ५६ प्रवासी क्षमतेची एक कॅटामरान बोट 

० बेलापूर येथून दक्षिण मुंबईत भाऊचा धक्का येथे पोहोचण्यास स्पीड बोटीने फक्त ३५ मिनिटे तर कॅटामरान बोटीला ४५ ते ५० मिनिटे.

० स्पीडबोटीचे भाडे प्रति प्रवासी ८०० ते १२०० रुपये, तर कॅटामरान बोटीकरिता प्रति प्रवासी २९० रुपये.

० बेलापूर येथून एलिफंटा, जेएनपीटी या जलमार्गावरसुद्धा प्रवासी सेवा चालवणार.

महागडा प्रवास : नाराजीचा सूर

वॉटर टॅक्सी प्रवासासाठी ८०० ते १२०० रुपये मोजावे लागणार आहेत. बेलापूर ते भाऊचा धक्का हे अंतर ३० ते ३५ मिनिटांत गाठता येणार असले तरी त्यासाठी एवढे भाडे मोजणे प्रवाशांच्या आवाक्याबाहेर असल्याची प्रतिक्रिया लोकप्रतिनिधीनींही व्यक्त केली आहे. आमदार मंदा म्हात्रे यांनी सर्व मान्यवरांसमोर तिकीटदरांबाबत नाराजी व्यक्त केली. दर कमी करण्याची मागणीही त्यांनी केली.

आरक्षण..ऑनलाइन आरक्षण http://www.mumbaiwatertaxi.com आणि  http://www.myboatride.com या संकेतस्थळावर करता येईल. तर भाऊचा धक्का येथे कागदी तिकीट सुविधा उपलब्ध असेल.

More Stories onमुंबईMumbai
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: First water taxi service from today abn
First published on: 18-02-2022 at 01:42 IST