मुंबई: भारतीय हवामानशास्र विभाग (आयएमडी) आणि इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशियन इनफॉर्मेशन सर्व्हीसने (आयएनसीओआयएस) शनिवार, ४ मे रोजी सकाळी ११.३० पासून ते रविवार, ५ मे रोजी रात्री ११.३० वाजेपर्यंत ३६ तासांच्या कालावधीत समुद्रात भरतीच्या वेळी अधिक उंच लाटा उसळण्याची (swell surge waves) शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे मुंबईकरांनी समुद्रकिनाऱ्यावर जाणे टाळावे, असे आवाहन मुंबई महापालिका प्रशासनाने केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हा इशारा लक्षात घेता, समुद्र किनारपट्टी परिसरात तसेच सखल भागांमध्ये या उसळणाऱ्या लाटांचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भरतीच्या कालावधीत समुद्राच्या लाटांच्या उंचीत सरासरी ०.५ मीटर ते १.५ मीटर इतकी वाढ होण्याची शक्यता आहे. परिणामी, येत्या ३६ तासांमध्ये नागरिकांनी समुद्रात जाणे टाळावे. तसेच मच्छिमार बांधवांनी योग्य दक्षता घ्यावी. सर्व यंत्रणांना नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

हेही वाचा : आवक घटल्याने शहाळी महाग

समुद्रात उसळणाऱ्या उंच लाटाचा इशारा लक्षात घेऊन महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी महानगरपालिकेच्या सर्व सहायक आयुक्तांना पोलिसांसोबत समन्वय साधण्याचे आवाहन केले आहे. तसेच महानगरपालिकेचे सुरक्षा रक्षक आणि जीवरक्षक यांच्या मदतीने नागरिकांना समुद्रात जाण्यापासून मज्जाव करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विशेषतः उन्हाळी सुटीच्या निमित्ताने समुद्र किनाऱ्यांवर वाढणारी पर्यटकांची संख्या लक्षात घेता अतिरिक्त खबरदारी घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. उंच लाटांमुळे किनारपट्टी भागात रहिवास असलेल्या नागरिकांनी देखील योग्य ती खबरदारी बाळगावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

हेही वाचा : राज ठाकरेंचं वक्तव्य चर्चेत, “हिटलर ज्वलंत राष्ट्रभक्त, त्याच्या चांगल्या गोष्टी..”

उसळणाऱ्या उंच लाटांमुळे नुकसान होऊ नये म्हणून मच्छीमार बांधवांनी आपल्य़ा बोटी किनाऱ्यावर सुरक्षित अंतरावर ठेवाव्या. समुद्रात मच्छिमारी करताना खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे. या संपूर्ण परिस्थितीवर महापालिका, मुंबई अग्निशमन दल, मुंबई पोलीस, तसेच इतर यंत्रणा लक्ष ठेवून आहेत. पर्यटक व किनारपट्टीवर वास्तव्यास असलेल्या सर्व नागरिकांनी या कालावधीत घाबरून न जाता दक्ष राहावे, समुद्रात जावू नये. तसेच समुद्र किनारी तैनात असलेले महापालिकेचे सुरक्षा रक्षक, जीवरक्षक तसेच अधिकारी, कर्मचारी आणि सर्व यंत्रणांना नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

भरती, ओहोटीच्या वेळा आणि लाटांची उंची

४ मे २०२४

ओहोटी – दुपारी २.३६ वाजता – १.४० मीटर

भरती – रात्री ९.०९ वाजता – ४.०८ मीटर

५ मे २०२४

ओहोटी – पहाटे ३.३० वाजता – १.०५ मीटर

भरती – सकाळी ९.५० वाजता – ४.०४ मीटर

ओहोटी – दुपारी ३.३५ वाजता – १.३२ मीटर

भरती – रात्री ९.५६ वाजता – ४.२४ मीटर

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In mumbai possibility of high waves in sea in next 36 hours imd and incois warning mumbai print news css