मुंबई : राज्यातील लोकसभेच्या ४८ जागांचे वाटप करण्यासाठी महाविकास आघाडीने ९ जणांची समिती स्थापन केली असून यामध्ये तीन पक्षांचे प्रत्येकी तीन सदस्य आहेत.इंडिया या देशपातळीवरील विरोधी पक्षांच्या आघाडीच्या मुंबईत झालेल्या बैठकीत राज्यातील जागा वाटपाबाबत एक समिती स्थापन करून चर्चा सुरू करण्याचे ठरले होते. त्यानुसार ही समिती स्थापन केली आहे. काँग्रेस पक्षाकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बसवराज पाटील आणि नसीम खान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडून खासदार संजय राऊत, विनायक राऊत, अनिल देसाई तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाकडून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आणि अनिल देशमुख यांचा समावेश आहे.
काँग्रेस पक्षाने राज्यातील सर्व लोकसभा मतदार संघांचा दोनदा आढावा घेतला आहे. शिवसेना ठाकरे गटाने दोन टप्प्यात उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रातील मतदारसंघांचा आढावा घेतला असून तिसऱ्या टप्प्याला सुरुवात केली आहे. तर राष्ट्रवादी पक्षाचे शरद पवार यांनीदेखील मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला आहे. ही समिती जागा वाटपाची प्राथमिक चर्चा करणार आहे. कोणता मतदारसंघ कोणाकडे गेल्यास विजयाची शक्यता तपासणे, कोणत्या मतदार संघात कोणता उमेदवार विजयी होईल, आदी मुद्दय़ांवर ही समिती चर्चा करणार आहे, महाविकास आघाडीला निवडणुकीच्या तयारीसाठी वेळ मिळावा म्हणून लवकरात लवकर जागा वाटप पूर्ण व्हावे हा आघाडीचा प्रयत्न आहे.तीन पक्ष एकत्र आल्याने महाविकास आघाडीत जागा वाटपावरून रस्सीखेच होण्याची शक्यता आहे.