रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची घोषणा; पास दरात मात्र बदल नाही

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : वातानुकूलित लोकलच्या तिकीट दरात ५० टक्क्यांनी कपात करण्याची घोषण रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शुक्रवारी केली. मात्र पासचे दर कमी करण्याबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे मुंबईकरांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. या निर्णयाची लवकरच अंमलबजावणी केली जाईल, अशी माहितीही दानवे यांनी दिली.

मध्य रेल्वेवरील भायखळा रेल्वे स्थानकाचे सुशोभिकरण करण्यात आले आहे. त्याचे औपचारिक उद्घाटन दानवे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी त्यांनी ही घोषणा केली.

मध्य रेल्वेवरील सीएसएमटी ते कल्याण, बदलापूर, टिटवाळा, तसेच पनवेल, गोरेगावसाठी ६० वातानुकूलित लोकल फेऱ्या, तर चर्चगेट ते बोरीवली, विरारसाठी दररोज २० वातानुकूलित लोकल फेऱ्या होत आहेत. गेल्या काही वर्षांत वातानुकूलित लोकल फेऱ्यांना प्रवाशांचा फारसा प्रतिसाद नाही. सध्या उकाडा असल्याने यातील काही फेऱ्यांना प्रतिसाद मात्र मिळत आहे. तरीही तो समाधानकारक नाही. वातानुकूलित लोकलचे दर कमी करा, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत होती.

वातानुकूलित लोकलबाबत प्रवाशांची मते जाणून घेण्यासाठी मध्यंतरी रेल्वे प्रशासनाने एक सर्वेक्षण केले होते. यामध्ये ३७ हजार प्रवाशांनी मते नोंदवली होती. ७० टक्के प्रवाशांनी वातानुकूलित लोकलचे तिकीट दर सामान्य लोकलमधील प्रथमश्रेणी तिकीट दरापेक्षा दहा टक्के अधिक असल्याचे सांगितले होते. यानंतर तिकीट दर कमी करण्याबाबत मध्य आणि पश्चिम रेल्वेने रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव पाठवला होता. त्यानुसार तिकीट दरात ५० टक्के कपात करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली. मात्र पासदरात कपात करण्याबाबत कोणतीही मागणी नसल्याचे स्पष्ट केले.

भायखळा स्थानकाचे सुशोभिकरण

मध्य रेल्वेवरील ब्रिटिशकालिन असलेल्या भायखळा स्थानकाचे ‘मुंबई हेरिटेज कमिटी’, ‘आय लव्ह यू मुंबई बजाज ट्रस्ट ग्रुप’, ‘आभा लांबा असोसिएशन’ यांच्यावतीने सुशोभिकरण करून नवी झळाळी देण्यात आली आहे. रेल्वेच्या वैभवशाली इतिहासाचा भाग असलेल्या या स्थानकाचे जीर्णोद्धार आणि सुशोभीकरण केले आहे. तेथील प्राचीन वास्तूला मात्र धक्का लावण्यात आलेला नाही. यासाठी चार कोटी रुपये खर्च आला आहे. स्थानकातील छताची ठेवण पुरातन वास्तूप्रमाणे करतानाच दरवाजे, खिडक्या दुरुस्त करून अतिरिक्त बांधकामे हटविण्यात आली आहेत, तसेच अन्य कामेही केली आहेत.

‘इंधन दरवाढीपासून दिलासा द्या’: सुशोभिकरण कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. वातानुकूलित लोकलचे तिकीट दर कमी केल्याने यावेळी केंद्र सरकारचे आभार मानतानाच आता राज्य सरकारने कर कमी करावा आणि जनतेला इंधन दरवाढीपासून दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. देशात खूप जुन्या ऐतिहासिक वास्तू असून प्रत्येकानेच आपला ऐतिहासिक वारसा जपणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले.

सामान्य लोकलच्या प्रथम श्रेणीच्या भाडेदरातही कपात

वातानुकूलित लोकलच्या भाडेदरात ५० टक्के कपात केली असतानाच रेल्वे बोर्डाने मध्य व पश्चिम रेल्वेवर धावणाऱ्या विना वातानुकूलित लोकलच्या (सामान्य लोकल) प्रथम श्रेणीच्या तिकिट दरातही ४० ते ५० टक्के कपात केली आहे. मात्र प्रथम श्रेणीच्या पासदरात कोणतेही बदल केले नाहीत. या दोन्ही सेवांसाठी नवीन तिकीट दरांची अंमलबजावणी ५ मेपासून करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. सीएसएमटी ते दादर, वडाळाचे प्रथम श्रेणीचे भाडे ५० रुपयांवरुन २५ रुपये होऊ शकते, तर ठाणेर्पयचे भाडे १४० रुपयांवरुन ८० रुपये आणि चर्चगेट ते अंधेरीचे भाडे १०५ रुपयांवरुन ६० रुपये तर वसईपर्यंतचे भाडे १६५ वरुन ९५ रुपये होऊ शकते, असे सांगण्यात आले.

अंदाजित नवीन तिकीट दर पुढील प्रमाणे

किमी   सध्याचा दर     नवीन दर

५      ६५           ३० 

२५     १३५          ६५

५०     २०५          १००

१००    २९०        १४५

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai ac local train fare to be slashed by 50 percent raosaheb danve zws