मुंबई : जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यासाठी सोमवारपासून राज्य सरकारी कर्मचारी संघटनांनी पुकारलेल्या बेमुदत संपाचा परिणाम मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांवर होऊ लागला आहे. महानगरपालिकेच्या नायर आणि शीव रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या वाढत असून बाह्यरुग्ण विभागातील आरोग्य सेवेवर ताण येऊ लागला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

 संपामुळे जे. जे., जीटी, कामा आणि सेंट जॉर्जेस या रुग्णालयांतील कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. त्यामुळे या राज्य सरकारच्या रुग्णालयांतील आंतर रुग्ण सेवा आणि शस्त्रक्रियेवर परिणाम झाला आहे. त्याचपाठोपाठ आता बाह्यरुग्ण विभागातील रुग्ण संख्येत घट होत आहे. मात्र ही घट होत असताना मुंबई महानगरपालिकेच्या शीव आणि नायर रुग्णालयांतील बाह्यरुग्ण विभागावर ताण वाढू लागला आहे. नायर रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागामध्ये साधारणपणे दररोज १५०० ते दोन हजार रुग्ण येतात. मात्र गेल्या तीन दिवसांपासून रुग्णांची संख्या दोन हजार ५०० ते दोन हजार ७०० च्या घरात गेली आहे.

रुग्णांची संख्या वाढू लागल्याने दुपारी १२ वाजता बंद होणारे बाह्यरुग्ण विभाग दुपारी ३ पर्यंत सुरू ठेवावे लागत आहेत. तसेच डॉक्टरांवर ताण पडत असल्याची माहिती नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रवीण राठी यांनी दिली. संप आणि रुग्णांची वाढणारी संख्या लक्षात घेऊन रुग्णालयातील विभागप्रमुख, डॉक्टर, प्राध्यापक, परिचारिका आणि कर्मचारी यांना सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या असल्याचे राठी यांनी सांगितले.  तसेच शीव येथील लोकमान्य टिळक सर्वसाधारण रुग्णालयातील रुग्णसंख्येत वाढ झाली असून, पूर्वीच्या तुलनेत रुग्णांच्या संख्येत २० ते २५ टक्के वाढ झाली आहे. रुग्णांना योग्य उपचार मिळावेत यासाठी बाह्यरुग्ण विभागाच्या वेळेत वाढ करण्यात आली आहे, असे शीव रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी सांगितले.

आवश्यक  काळजी घेण्याच्या सूचना

राज्य सरकारी रुग्णालयांतील कर्मचाऱ्यांच्या संपामुळे मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांवर ताण येऊ लागला आहे. त्याचबरोबर खासगी रुग्णालये आणि क्लिनिकमधील रुग्णांच्या संख्येत फारशी वाढ झालेली नाही, अशी माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनचे सचिव डॉ. एस. कदम यांनी दिली. मात्र संप लक्षात घेता आवश्यक ती काळजी घेण्याच्या सूचना सर्व खासगी रुग्णालये आणि आयएमएशी संलग्न डॉक्टरांना दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

‘एच ३ एन २’चे तीन संशयित मृत्यू

राज्यामध्ये शनिवारी ‘एच ३ एन २’बाधित तिघांचा संशयित मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. वाशीम, खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि पुणे मनपा येथे या मृत्यूंची नोंद झाली. त्यामुळे संशयित मृत्यूंची संख्या चार झाली आहे. तसेच शनिवारी १८ नवे रुग्ण सापडले. राज्यात दिवसेंदिवस ‘एच ३ एन २’ आणि ‘एच १ एन १’ रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्या1मुळे चिंता व्यक्त होत आहे.

सेवा सुरळीत ठेवण्यासाठी रोजंदारीवर कर्मचारी

जुनी सेवानिवृत्ती वेतन योजना लागू करण्यासाठी राज्य सरकारी-निमसरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपाचा सर्वाधिक फटका आरोग्य व्यवस्थेला बसू लागला आहे. त्यामुळे ढासळणारी आरोग्य व्यवस्था सुरक्षित ठेवण्यासाठी रोजंदारीवर कर्मचारी घेण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. त्यानुसार रोजंदारी तसेच कंत्राटी कर्मचारी घेऊन रुग्णांना सेवा देण्याचे आदेश आरोग्य सेवा आयुक्त धीरज कुमार यांनी दिले.

  राज्यातील विविध सरकारी-निमसरकारी कर्मचारी संघटनांनी १४ मार्चपासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपाचा मोठा परिणाम आरोग्य व्यवस्थेवर होऊ लागला आहे. राज्यभरात ठिकठिकाणी डॉक्टर, परिचारिका तसेच आरोग्य कर्मचारी संपावर गेल्याने रुग्ण सेवेत अडथळे  येत आहेत. शस्त्रक्रिया रखडलेल्या असून रुग्णांवर उपचार करतानाही सरकारी रुग्णालयातील व्यवस्था तोकडी पडू लागली आहे. परिणामी ढासळणारी आरोग्य व्यवस्था सावरण्यासाठी तसेच रुग्ण सेवेत कुठेही बाधा येऊ नये व विनाअडथळा सार्वजनिक आरोग्य सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध राहाव्यात यासाठी पर्यायी तसेच कंत्राटी मनुष्यबळाचा वापर करून नियोजन करण्याचे आदेश आरोग्य मंत्रालयाने दिले आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Municipal hospitals strike 25 percent increase in number of patients ysh