Pune Porsche Accident: पुणे पोर्श अपघात प्रकरणाची चर्चा राज्यभरात सुरु झाली आहे. अल्पवयीन मुलाला बालसुधारगृहात पाठवण्यात आलं आहे. या मुलाच्या वडिलांना अटक करण्यात आली आहे. तसंच मुलाचे आजोबा, त्यांच्या घरातला चालक यांच्यासह बार मालकांचीही चौकशी सुरु आहे. या प्रकरणामध्ये विरोधी पक्षातील नेत्यांनी पुणे पोलिसांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. अशात शरद पवार यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली आणि दुष्काळाचा प्रश्न मांडला. पोर्श अपघात प्रकरणी त्यांना एक प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांचा संताप झाला.

अश्विनी कोस्टा आणि अनिश अवधियांचा मृत्यू

 पुण्यातल्या कल्याणी नगर भागात एका अल्पवयीन मुलाने पोर्श या महागड्या कारने दोघांना धडक दिली. अश्विनी कोस्टा आणि अनिश अवधिया या दोघांचा मृत्यू या धडकेत झाला. या दोन निरपराधांचा बळी घेतल्यानंतर या अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली होती. मात्र अवघ्या १५ तासांमध्ये त्याला जामीन मिळाला. ज्याचे पडसाद सोशल मीडियासह राज्यभरात उमटले.

हे पण वाचा- Porsche Accident: अल्पवयीन मुलाच्या कुटुंबाने त्यांच्या चालकाला पैशांचं आमिष दिलं आणि सांगितलं, आरोप..

मुलाच्या वडिलांना करण्यात आली अटक

सोशल मीडियासह पुणे आणि राज्यभरातून पोर्श अपघात प्रकरणावर जेव्हा संतप्त पडसाद उमटले त्यानंतर दोन जणांचा बळी घेणाऱ्या अल्पवयीन मुलाची रवानगी १४ दिवसांसाठी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. तसंच या प्रकरणात मुलाच्या वडिलांना अटक करण्यात आली आहे. या मुलाचे वडील पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आहेत.

शरद पवार यांचा संताप

पोर्श प्रकरणात पालकमंत्री का आले नाहीत? हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे. तसंच वकिलाबरोबर फोटो छापला म्हणजे म्हणजे त्याच्याशी संबंध कसा काय झोडता? एखाद्या पेपरने माझा फोटो छापला असेल म्हणून लगेच त्याचा संबंध का लावता? प्रत्येक गोष्टीवर मी भाष्य करणं गरजेचं नाही. या प्रकरणात गृहमंत्र्यांनी जबाबदारी पार पाडलेली दिसते आहे. मग त्या गोष्टीला वेगळं स्वरुप देण्याची आवश्यतकता नाही असं शरद पवारांनी म्हटलं आहे.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार काय म्हणाले?

पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार “पोर्श कार चालवणाऱ्या अल्पवयीन मुलाच्या रक्तचाचणीचा अहवाल महत्त्वाचा नाही. रक्त चाचणी अहवाल असो किंवा नसो हे प्रकरण असे आहे की अल्पवयीन मुलाला हे माहीत होतं की दारु पिणे आणि अरुंद रस्त्यावर भरधाव वेगाने कार चालवणं यामुळे लोकांचा मृत्यू होऊ शकतो. आम्ही या प्रकरणात कसून तपास करतो आहोत तसंच ठोस पुरावे गोळा करत आहोत. तांत्रिक पुराव्यांवर आम्ही लक्ष केंद्रीत करत आहोत.”