मुंबई महापालिकेच्या कारभारावरील कॅगचा चौकशी अहवाल अलिडेच समोर आला. यामध्ये मुंबईतल्या मिठी नदीच्या स्वच्छतेच्या कामावर बोट ठेवण्यात आलं आहे. मिठी नदीच्या स्वच्छतेचं काम एकाच कंपनीला दिलं जात आहे, एकाच कंपनीला सातत्याने कंत्राट देऊनही मिठी नदीच्या सफाईचं काम झालेलं नाही. कॅगच्या अहवालात याबद्दल विस्तृत माहिती समोर आली आहे. याबाबत मनसे नेते संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले की, सातत्याने मनसेने या गोष्टी मांडल्या आहेत. मिठी नदीची स्वच्छता हा सगळ्यात मोठा घोळ आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देशपांडे म्हणाले की, नदी साफ करण्याचं कंत्राट हा मोठा घोळ आहे. यासंबंधीचा एक व्हिडीओ आम्ही जारी केला होता. तसेच आमची मागणी होती की सफाईचं काम केलं जात आहे तिथे सीसीटीव्ही कॅमेरे लावावे. ते अद्याप लावलेले नाहीत. कारण यामागे सक्रीय वीरप्पन गँग आहे. ही वीरप्पन गँगची कामगिरी आहे. वीरप्पन गँगने जेवढं जंगलात लुटलं नसेल तेवढं मुंबईतल्या वीरप्पन गँगने महापालिकेला लुटलं आहे. मुंबई महापालिकेवर गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेची असल्याने देशपांडे यांनी शिवसेनेवर हल्ला चढवला आहे. सध्या मुंबई महापालिकेचा कारभार प्रशासक म्हणून आयुक्त इक्बालसिंह चहल पाहात आहेत.

हे ही वाचा >> “…की घरी बसून अंडी उबवणार?” सावरकरांच्या अपमानावरून राहुल गांधींना इशारा देणाऱ्या उद्धव ठाकरेंना मनसेचा टोला

“लेखापरीक्षा विभाग झोपा काढतोय का?”

देशपांडे म्हणाले की, आम्ही जे मुद्दे गेल्या ५ वर्षांपासून मांडतोय. तेच कॅगने मांडले आहेत. वीरप्पन गँगने महापालिका लुटली आहे. जे आम्ही बोलत होतो त्यावर शिक्कामोर्तब करण्याचं कामं कॅगने केलं आहे. मुंबई महापालिकेचा स्वतःचा लेखापरीक्षा विभाग आहे. यात ७०० कर्मचारी आहेत. असं असतानाही महापालिकेचा लेखापरीक्षा विभाग झोपा काढत होता का? त्यांना त्यात अनियमिता का दिसली नाही? या प्रश्नांचा पाठपुरावा होणं गरजेचं आहे आणि संबंधित लोकांवर कारवाई झाली पाहिजे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sandeep deshpande slams shiv sena thackeray group over bmc cag report rno news asc