लोकसभा सदस्यत्व रद्द झाल्यानंतर घेतलेल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी भाजपची माफीबद्दलची मागणी धुडकावली. राहुल म्हणाले की, “माफी मागायला माझं नाव सावरकर नाही, गांधी आहे”. राहुल गांधी सातत्याने स्वातंत्र्यवीर सावरकरांवरून भाजपाला लक्ष्य करत आहेत. दरम्यान, आता शिवसेनेच्या ठाकरे गटाकडूनही राहुल गांधींना सूचनावजा सल्ला देण्यात आला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मालेगावच्या जाहीर सभेत राहुल यांना ठणकावलं. सावरकरांचा अपमान सहन करणार नाही, असा इशारा उद्धव यांनी राहुल गांधींना दिला.

दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उद्धव ठाकरे यांचा समाचार घेतला आहे. मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले की, “राहुल गांधी जे बोलले आणि त्यावर उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधींना जो इशारा दिला त्याचं वर्णन मी मॅच फिक्सिंग असं करेन. सावरकरांचा अपमान सहन करणार नाही म्हणजे काय करणार? हे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट करावं.”

नेमकं करणार काय ते उद्धव ठाकरे यांनी सांगावं : देशपांडे

देशपांडे म्हणाले की, “राहुल गांधी अपमान करत राहणार आणि उद्धव ठाकरे त्यांना उत्तर देणार, हे म्हणजे बोलाची कढी आणि बोलाचाच भात अशी स्थिती आहे. उद्या राहुल गांधी पुन्हा एकदा सावरकरांचा अपमान करतील. मग हे काय फक्त सामनात अग्रलेख लिहिणार की घरी बसून अंडी उबवणार? नेमकं करणार काय ते त्यांनी सांगावं.”

हे ही वाचा >> “भाजपा-मित्रपक्ष शिंदे गटाची ताकद संपवत आहेत”; आमदार रोहित पवारांचा दावा, म्हणाले, “आठवलेंच्या कृतीकडे पाहा”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मनसे नेते म्हणाले की, “एकीकडे हे (उद्धव ठाकरे) म्हणणार आम्ही अपमान सहन करणार नाही आणि तिकडे राहुल गांधी अपमान करत राहणार. त्यापेक्षा कारवाई काय करणार हे उद्धव ठाकरे यांनी सांगावं. काँग्रेससोबतची युती तोडणार का? महाविकास आघाडीतून बाहेर पडणार का? हे त्यांनी स्पष्ट करावं.”