मुंबई : नाटकाचे लेखन, अभिनय आणि त्यातही वेगवेगळ्या धाटणीचे नाटक करण्यात रमलेला अभिनेता संकर्षण कऱ्हाडे सध्या रंगभूमीवर वेगवेगळे प्रयोग करू पाहत आहे. त्याच प्रयोगांचा एक भाग म्हणून तो रविवार, १८ जून रोजी एकाच दिवशी तीन नाटकांचे प्रयोग करणार आहे. आपलेच लेखन आणि आपलीच मुख्य भूमिका असलेल्या तीन नाटकांचे एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या ठिकाणी प्रयोग असे याआधी कोणत्याही कलाकाराच्या बाबतीत घडलेले नाही. ‘मला ही सुवर्णसंधी मिळाली आहे. नेहमी ज्या उत्साहाने आणि उर्जेने आम्ही नाटक करतो तोच उत्साह पहिल्या प्रयोगापासून तिसऱ्या प्रयोगापर्यंत टिकवून ठेवत रसिकांसमोर नाटक सादर करणे हे खरे आव्हान आहे’, असे संकर्षणने ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘संकर्षण व्हाया स्पृहा’, ‘तू म्हणशील तसं’ आणि ‘नियम व अटी लागू’ या संकर्षणच्या तिन्ही नाटकांचे प्रयोग सध्या रंगभूमीवर जोरदार सुरू आहेत. ‘संकर्षण व्हाया स्पृहा’ हा कवितांच्या सादरीकरणाचा कार्यक्रम आहे, ज्याचे आतापर्यंत ७ ते ८ प्रयोग झाले आहेत. ‘तू म्हणशील तसं’ या नाटकानेही ३०० प्रयोगांचा पल्ला पार केला आहे आणि ‘नियम व अटी लागू’ याही नाटकाचे ५० प्रयोग झाले असून नुकताच या नाटकाने ऑस्ट्रेलिया दौरा केला आहे. या तिन्ही नाटकांचा लेखक मी आहे आणि अभिनेता म्हणून या तिन्ही प्रयोगांमध्ये मी सादरीकरण करतो. योगायोग म्हणजे या तिन्ही नाटकांचे निर्माते प्रशांत दामले आहेत आणि त्यांच्यामुळे या एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या ठिकाणी तीन नाटक सादर करण्याचा हा प्रयोग साध्य होणार आहे, अशी माहिती संकर्षणने दिली.

हेही वाचा >>>मुंबई: सोसाट्याच्या वाऱ्यामुळे वृक्ष उन्मळून पडला; एलबीएस मार्गावर वाहतूक कोंडी

नाटकातून वेळ मिळाला तर…

हल्ली सगळेच मराठी कलाकार चित्रिकरणातून वेळ मिळाला की नाटक करतात. मी मुळात नाटक करण्यासाठीच परभणीतून मुंबईत आलो होतो. त्यामुळे शेवटपर्यंत रंगभूमीवरच कार्यरत राहायचे हे पहिल्यापासूनच मनात पक्के होते. नाटक करताना प्रेक्षकांचा जो थेट प्रतिसाद मिळतो त्याची मजाच वेगळी आहे. तुमच्या लेखनाला आणि अभिनयाला दाद देण्यासाठी चार-पाचशे रुपयांची तिकीटे काढून प्रेक्षक हजर असतात हे खूप महत्त्वाचे आहे. कलाकार नाटकाशी जोडला गेलेला नसतो, तर नाटक कलाकाराला जोडून घेते. त्यामुळे नाटकातून फावला वेळ मिळाला तर मी इतर काम करेन, असे संकर्षणने सांगितले.

हेही वाचा >>>मुंबईः घाटकोपरमध्ये टेम्पोच्या अपघातात आठ जण जखमी; एकाची प्रकृती गंभीर

प्रयोग कुठे ?

रविवार, १८ जूत्रोजी सकाळी १० वाजता स्वरगंध कलामंच गोरेगाव येथे होणाऱ्या कार्यक्रमात ‘संकर्षण व्हाया स्पृहा’, त्यानंतर बोरिवलीत प्रबोधन ठाकरे नाट्यगृहात ४ वाजता ‘तू म्हणशील तसं’ या नाटकाचा प्रयोग आणि रात्री ८ वाजता ठाण्यात गडकरी रंगायतन येथे ‘नियम व अटी लागू’ या नाटकाचा प्रयोग होणार आहे. २५ जूनला पुण्यातही अशाच पध्दतीने या तीन नाटकांचे एकाच दिवशी प्रयोग होणार असल्याचेही त्याने सांगितले.

प्रशांत दामले यांचा विक्रम

या तिन्ही नाटकांचे निर्माते प्रशांत दामले आहेत. प्रशांत दामले यांनी स्वत: २००१ मध्ये एकाच दिवशी तीन नाटकांचे पाच प्रयोग करण्याचा विक्रम केला होता, त्याहीआधी १९९५ मध्ये एकाच दिवशी ४ नाटकांचे प्रयोग त्यांनी केले होते. तर अभिनेता वैभव मांगले यांनी २०१८ मध्ये ‘अलबत्या गलबत्या’ या नाटकाचे एकाच दिवशी पाच प्रयोग केले होते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sankarshan karhade plays will be screened on a 18 june sunday mumbai print news amy