मुंबई : मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार आणि झुंजार पत्रकार आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणाऱ्या पुरस्कारासाठी ज्येष्ठ पत्रकार रमेश झवर यांची निवड करण्यात आली आहे.
दैनिक ‘मराठा’ ते दैनिक ‘लोकसत्ता’ असा झवर यांचा सलग प्रवास आहे. या कालावधीत उपसंपादक, वार्ताहर, मुख्य उपसंपादक, वृत्तसंपादक, सहसंपादक अशा विविध पदांवर त्यांनी काम केले आहे. दै. ‘लोकसत्तामध्ये’ व्यापार उद्योग पुरवणी (कॉमर्स विभाग) व प्रादेशिक विभाग हेही त्यांनी समर्थपणे सांभाळले होते. तसेच संपादकीय पानावरील लेख, स्फुट तसेच ‘लोकसत्ता’चे अनेक अग्रलेखही त्यांनी लिहिले आहेत. निवडणुका, साहित्य संमेलने, देश – विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचे वृत्तांकनही त्यांनी केले आहे.
हेही वाचा..मुंबई : ७५ किलो गांजा व ४८०० कोडीनच्या बाटल्या जप्त, सहा जणांना अटक
दरम्यान, आचार्य अत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली दैनिक ‘मराठा’मध्ये काम केलेले झवर हे ५० वर्षांहून अधिक काळ पत्रकारितेत सक्रिय आहेत. वयाची ८० वर्षे पूर्ण झालेल्या झवर यांचे आजही समाज माध्यमांवर माहितीपूर्ण लिखाण सुरू आहे. त्यांचा ब्लॉग लोकप्रिय झाल्यावर त्यांनी स्वत:ची वेबसाईट सुरू केली. या साईटलाही देश – विदेशातून सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मुंबई मराठी पत्रकार संघाचे कोषाध्यक्ष म्हणूनही अनेक वर्ष झवर कार्यरत होते.
© The Indian Express (P) Ltd