शिवसेना खासदार ‘ईडी’ संचालकांना भेटणार; सोमय्या यांच्या तक्रारीचा आधार

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी अंमलबजावणी संचालनालयाची (ईडी) कारवाई टाळण्यासाठी बेईमानी करून भाजपमध्ये प्रवेश केला, असा आरोप करीत शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी मंगळवारी राणेंच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले.

 राणेंविरोधात भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनीच अनेक आरोप करून कारवाई करण्यासाठी ईडीकडे कागदपत्रे दिली होती. त्या तक्रारीचे काय झाले हे जाणून घेण्यासाठी शिवसेनेचे खासदार येत्या दोन-तीन दिवसांत सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) संचालकांना भेटणार असल्याचे राऊत यांनी सांगितले.

 त्या राणेंच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना शिवसेना नेत्यांनीही ध्वनिचित्रफितीचे पुरावे पत्रकार परिषदेत सादर केले. राऊत म्हणाले, राणे यांनी पत्नीच्या नावे बांधलेल्या हॉटेल आणि अन्य बाबींमध्ये अनेक गैरव्यवहार असून बांधकामासाठी काही कंपन्यांकडून १०० कोटी रुपये घेतले होते.

त्यांच्या कुटुंबीयांच्या नावे अनेक कंपन्या नोंदविण्यात आल्या आहेत. किरीट सोमय्या यांनीच राणेंच्या गैरव्यवहाराबाबत आरोप करून ईडीकडे चौकशीची मागणी केली आहे. त्यानुसार चौकशी सुरू झाली होती. त्या चौकशीचे पुढे काय झाले, असा सवाल राऊत यांनी केला.

 या तक्रारीचे पुढे काय झाले हे जाणून घेण्याकरिताच ईडीच्या प्रमुखांची भेट घेणार असल्याचे राऊत यांनी सांगितले.

ध्वनिचित्रफीतही सादर..

 आमदार राजन तेली यांचा मुलगा प्रथमेश याच्यावर दादर रेल्वे स्थानकावर जीवघेणा हल्ला झाला होता. त्यावेळी त्यांनीही नितेश राणे यांच्यावर आरोप केले होते. सोमय्या यांनी शाळांमध्ये मराठी भाषेची सक्ती नसावी यासाठी उच्च न्यायालयात याचिका सादर केली होती. सोमय्या आणि आमदार मंगलप्रभात लोढा यांच्याबाबत नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्याची ध्वनिचित्रफीतही राऊत यांनी सादर केली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena mp union minister narayan rane ed action join the bjp akp