महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी पहिल्या दिवसापासून प्रयत्न सुरु होते असा आरोप शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे. ठाकरे कधीही सत्तेचे लोभी नव्हते. एका विशिष्ट स्थितीत शरद पवार आणि काँग्रेस नेतृत्वाने उद्धव ठाकरेंना राज्याची धुरा सांभाळण्याची विनंती केली म्हणून त्यांनी ती मान्य केली होती असंही सांगितलं. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी मी शिवसेनेचा मुख्यमंत्री करुन दाखवला असं सांगत शिंदे गटाला आव्हानदेखील दिलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“उद्धव ठाकरेंनी काल देशाच्या जनतेशी संवाद साधला. महाराष्ट्रात कशी परिस्थिती निर्माण केली आणि राजीनामा द्यावा लागला हे त्यांनी संयमी आणि सभ्य भाषेत सांगितलं. आपल्याच लोकांनी कशी दगाबाजी केली हेदेखील त्यांनी सांगितलं. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर खुर्चाला चिकटून राहण्यात काही अर्थ नव्हता. कारण ठाकरे कधीही सत्तेचे लोभी नव्हते,” असं संजय राऊत म्हणाले.

उद्धव ठाकरेंनी राजीनामा देताच फडणवीसांनी मानले एकनाथ शिंदेंचे आभार, म्हणाले “त्यांनी हिंमत…”

“आज महाविकास आघाडीविरोधात तोंडाची डबडी वाजवत आहेत, मला, शरद पवारांना दोष देत आहेत हे सगळे बहुसंख्य मंत्री मंत्रिमंडळात सहभागी झाले, चांगली खाती मिळाली तेव्हा विरोध केला नाही. महाराष्ट्रात वेगळा प्रयोग होत आहे अशी त्यांची भावना होती. हा प्रयोग पुढील २५ वर्ष चालावा असं त्यांनी वक्तव्य केलं होतं. आता बाहेर पडायचं आहे म्हणून कारण कशाला देत आहात? राष्ट्रवादीला, काँग्रेसला, शरद पवारांना दोष देत असल्याचं आश्चर्य वाटत आहे. यामधली बऱ्याच जणांचं राजकीय पालनपोषण राष्ट्रवादीत आणि खासकरुन शरद पवारांच्या नेतृत्वाखाली झालं आहे,” असंही संजय राऊतांनी सांगितलं.

पाहा व्हिडीओ –

“काही कडवट शिवसैनिक गेल्याचं आम्हाला दुख आहे. कालपर्यंत आम्ही भावना व्यक्त करत होते. पण शेवटी सरकार पाडून दाखवण्याचं कंत्राट त्यांना मिळालं होतं. ते त्यांनी पूर्ण केलं आहे त्याबद्दल शुभेच्छा,” असं राऊत म्हणाले.

VIDEO: राजीनामा देत असताना राज्यपालांसमोरच शिवसैनिकांची घोषणाबाजी; त्यानंतर उद्धव ठाकरेंनी केलं असं काही…

“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्तावर सर्वांचा विश्वास होता. सर्व जाती, धर्म आणि पंत यांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला होता. प्रमुख नेत्यांनीही त्यांच्यावर विश्वास टाकला होता. पण हे सरकार पाडण्यासाठी पहिल्या दिवसापासून प्रयत्न सुरु होते. ते कोणत्या प्रकारे सुरु होते हे लक्षात येत होतं,” असा गंभीर आरोप राऊतांनी केला. एक उत्तम विरोधी पक्ष म्हणून काम करण्याची आमची भूमिका असल्याचंही ते म्हणाले. आम्ही हे सरकार पाडू असं म्हणणार नाही. येणाऱ्या सरकारने लोकहितासाठी काम करावं अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

“धनुष्यबाण जिवंत आहे सांगण्यासाठी ट्वीट टाकलं. आज इथे बसलो आहे, शिवसेनेचं मीठ खात आहे आणि १५ मिनिटांनी पळू गेलो ही आमची औलाद नाही. बहुधा उद्या दुपारनंतर मी ईडीसमोर हजर होणार असून भूमिका स्पष्ट करेन. मला पक्षाचं, महाराष्ट्राचं काम करण्यापासून रोखण्यासाठी हा दबाव आहे. या दबावाला घाबरुन काहीजण पळून गेले आहेत. कोणत्याही प्रकारची कारवाई झाली तरी मी सामोरा जाईन,” असं संजय राऊतांनी सांगितलं.

“तुम्ही उद्धव ठाकरेंना कसं समजावणार आहात. तुम्ही पक्ष फोडला आहे. ज्या पक्षाने अडीच वर्षांपूर्वी उद्धव ठाकरेंचा घात केला त्यांच्या मांडीला मांडी लावून बसत आहोत. ही एक स्वाभिमानाची लढाई होती आणि त्यातून सरकार स्थापन करावं लागलं. वाटाघाटी झाली असती तर पुढचा प्रयोग झाला नसता. खेळ तुम्ही संपवला आहात, पण तो संपला असं होत नाही. बाळासाहेबांची शिवसेना ज्वलंत शिवसेना आहे. ती संपवण्याचा प्रयत्न कोणी करु नये. दूर गेलेल्यांनी आपला मार्ग स्वीकारावा. बाळासाहेबांची शिवसेना आम्ही गगनाला गवसणी घालण्याइतपत मोठी करु,” असा निर्धार संजय राऊतांनी व्यक्त केला.

केसरकर यांनी तुम्हाला जबाबदार धरल्यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “पळून जाण्याच्या आदल्या दिवशी माझ्यासोबत चहा पिण्यासाठी बसले होते. केसरकर राष्ट्रवादीमधून आले आहेत. काहीतरी कारणं द्यायची म्हणून देऊ नका. मी किंवा शरद पवार जबाबदार ही काही कारणं नाहीत. समोर येऊन काय ते सांगा असं उद्धव ठाकरे सांगत होते. महाविकास आघाडीची स्थापना केली म्हणून मी जबाददार असेन तर ठीक आहे. आम्ही सर्वांनी मिळून महाराष्ट्राच्या हितासाठी आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री मिळावा हे स्वप्न पाहिलं होतं. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना जे वचन दिलं होतं त्यासाठी मी प्रतिष्ठा पणाला लावली. शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा यासाठी मी प्रयत्न केले. तुम्ही शिवसेनेचा मुख्यमंत्री करत आहात का? तुमचा नेता मुख्यमंत्री होणार आहे का? तुम्हाला धुणीभांडीच करावी लागणार आहेत. स्वाभिमानाची मीठ भाकरी सोडून चाकरी करत आहात याचा पश्चाताप होईल”.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena sanjay raut on uddhav thackeray resignation eknath shinde sharad pawar sgy
First published on: 30-06-2022 at 10:09 IST