लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : महानगरपालिकेने स्वच्छ व सुंदर मुंबईसाठी लहानमोठे रस्ते, गल्लीबोळ, रस्ते दुभाजकांसह शासकीय, महानगरपालिका व खासगी रूग्णालय परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबवली आहे. मात्र, आता पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावर विशेष स्वच्छता मोहीम राबवण्याचा महानगरपालिकेने निर्णय घेतला असून १७ ते २२ मार्च या सहा दिवसांच्या कालावधीत महामार्गाची स्वच्छता करण्यात येणार आहे. दररोज रात्री १० ते सकाळी ६ दरम्यान राबविण्यात येणाऱ्या स्वच्छता मोहिमेमुळे वाहनचालकांची गैरसोय होऊ नये, यासाठी पर्यायी वाहतूक मार्ग उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
मुंबई महानगराला जोडणारा महत्त्वाचा दुवा असलेल्या द्रुतगती महामार्गांवर विशेष स्वच्छता मोहीम राबविण्याचे आदेश महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहेत. पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग स्वच्छ, सुंदर रहावा, तसेच राडारोडा मुक्त असावा, हे या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट आहे. महामार्गावर सौंदर्यानुभवाच्या दृष्टीकोनातून नियमित सुशोभीकरण आणि सुरक्षेच्या उपाययोजना करण्याच्या सूचना अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अश्विनी जोशी यांनी दिल्या आहेत. या मोहिमेसाठी नियोजित कालावधीत कार्यवाही पूर्ण करण्याची जबाबदारी विभागीय कार्यालयांवर सोपवण्यात आली आहे. महामार्गाच्या ठिकाणी भूयारी मार्ग, सेवा रस्ते, उतार (रॅम्प) आणि बाहेर पडण्याचे मार्ग आदी परिसरात राडारोडा असणाऱ्या जागांची पूर्वपाहणी करून हे परिसर स्वच्छ करण्यात येणार आहेत. तसेच धूळ निर्मूलनासाठी यांत्रिक झाडू वापरण्यात येणार आहेत.
मोहिमेदरम्यान पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गाची स्वच्छता जेटींग, प्रेशर वॉशर यासारख्या संयंत्राचा वापर करून करण्यात येईल. तसेच रस्त्यावरील वाहतुकीसाठीची सांकेतिक चिन्हे, चौकातील फलक आणि दिशादर्शक फलक यांचीही स्वच्छता, रंगरंगोटी आणि देखभाल दुरूस्ती केली जाईल. द्रुतगती महामार्गालगतच्या कचरा पेट्यांमधील कचरा आणि संकलित केलेला राडारोडा वाहून नेणे, रोपे आणि झाडांभोवतीच्या कुंपणाचा कचरा काढणे, झाडांच्या बुंध्याला चुना आणि गेरूचा वापर करून शास्त्रोक्त पद्धतीने रंगरंगोटी करणे, बस थांब्याच्या ठिकाणची आसन व्यवस्था, अडगळीतील वस्तू आणि कचरा हटवणे, सार्वजनिक परिसरातील कचरा पेट्यांची स्वच्छता तसेच गरजेनुसार दुरुस्ती करणे, सार्वजनिक प्रसाधनगृह परिसरात नियमित स्वच्छता करणे, रस्त्यावर अडथळा ठरणाऱ्या जुन्या वाहनांचीही विल्हेवाट लावणे आदी नियोजन देखील या मोहिमेमध्ये केले आहे.
तसेच, पदपथांवरील पेव्हर ब्लॉक, दुभाजकांची विभागीय परिरक्षण खात्यामार्फत दुरूस्त, दुभाजकांची रंगरंगोटी, मोहिमेच्या काळात रस्त्यांना आणि पदपथ स्वच्छतेला अडथळा ठरणारी वाहने हटवणे, अनधिकृत फलक, जाहिरात फलक आदी निष्कासित करणे, आदींचाही या मोहिमेत समावेश करण्यात आला आहे.
पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गांवर तसेच त्यांना जोडणाऱ्या रस्त्यांवर सोमवारपासून विशेष स्वच्छता मोहिमेला सुरूवात होणार आहे. वाहतूक पोलिस विभागाच्या समन्वयाने ही मोहीम हाती घेण्यात येणार आहे. स्वच्छता कालावधीत वाहतूक विभागाच्या मदतीने गरजेनुसार वाहतूक वळवणे किंवा पर्यायी मार्ग उपलब्ध करण्यात येणार आहे. परिणामी, वाहतुकीला कोणताही अडथळा निर्माण होणार नाही. मोहिमेसाठी आवश्यक संयंत्रे, उपकरणे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, असे महापालिकेच्या उप आयुक्त चंदा जाधव यांनी सांगितले.
© The Indian Express (P) Ltd