राज्यात सलग १५ वर्षे सत्ता भोगणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारने  एसटी गाडय़ांना टोलमधून वगळण्याच्या अनेकदा घोषणा केल्या, परंतु प्रत्यक्षात तसा निर्णय घेतला नाही, परिणामी गेल्या १४ वर्षांत एसटी महामंडळाला टोलपोटी सुमारे ९८८ कोटी रुपये मोजावे लागले आहेत. त्यामुळे एसटीला टोलमुक्त व्हावी, यासाठी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत.
 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा केली असून एसटी टोलमुक्तीचा निर्णय लवकरच घेऊ, असे रावते यांनी सांगितले.  गेल्या १४ वर्षांत एसटीचा तोटा १२०० कोटी रुपयांवर गेला असून त्यात टोलवर झालेल्या ९८८ कोटी रुपयांचा समावेश आहे, असे रावते यांनी निदर्शनास आणून दिले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आघाडी सरकारने एसटीच्या टोलमुक्तीची घोषणा केली, मात्र निर्णय घेतला नाही. आताच्या सरकारची तशी इच्छा असेल तर केवळ राजकीय घोषणा न करता त्यांनी निर्णय घ्यावा.
– श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस.

व्होल्व्होच्या वेगाला ८०चा लगाम!
जगभरात आपल्या वेगासाठी ओळखल्या जाणाऱ्या व्होल्वो कंपनीच्या दणकट बसगाडय़ांना राज्य परिवहन महामंडळाने वेगळाच लगाम घातला आहे. ताशी शंभर ते १२० किलोमीटरच्या वेगातही जरादेखील न हलणाऱ्या या गाडय़ा एसटी महामंडळाच्या ‘शिवनेरी’ या नावाखाली ८० किलोमीटर प्रतितास या वेगापुढे जातच नाहीत. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी या गाडय़ांना वेगमर्यादा घालण्यात आल्याचे एसटी महामंडळाकडून सांगितले जात आहे.  प्रामुख्याने मुंबई, ठाणे ते पुणे या मार्गावर चालणारी शिवनेरी पुणे-औरंगाबाद, मुंबई-औरंगाबाद, मुंबई-नागपूर अशा मार्गावरही चालते. याबाबत एसटीच्या वाहतूक विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याला विचारले असता, एक्स्प्रेस मार्गावर किमान वेगमर्यादा ८० किमी आहे. एसटीच्या शिवनेरी गाडय़ा ही वेगमर्यादा पाळू शकतील, अशाच दृष्टीने ‘स्पीडलॉक’ तंत्रज्ञान व्होल्वो गाडय़ांमध्ये बसवले असल्याचे सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: St bus to spend 988 cr for toll in maharashtra