नागपूर : नातेवाईक महिलेने अश्लील शिवीगाळ करीत चारित्र्यावर संशय घेतल्याने महिला नैराश्यात गेली. तिने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. तत्पूर्वी महिलेने मोबाईलने स्वत:चे तीन व्हिडिओ काढले. त्यात नातेवाईक महिलेमुळे आत्महत्या करीत असल्याचे सांगितले आणि गळफास घेऊन आत्महत्या केली. ते व्हिडीओ पोलिसांच्या हाती लागले. त्यावरून पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून महिलेला अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शमा श्यामलाल पालीवाल (३८, रा.यशोदानगर, जयताळा) यांचे पतीचे निधन झाल्यानंतर मुलगा साहिल याच्यासह वेगळ्या राहत होत्या. त्यांनी हाताला काम नसल्याने खानावळीचा व्यवसाय सुरू केला. त्यामुळे महिलेच्या घरी जेवण करणाऱ्या ग्राहक येत होते. परंतु, तिची नातेवाईक महिला चंदा मनोज पालीवाल (४६, छत्रपतीनगर, सोनेगाव) हिला तिच्यावर वेगळाच संशय होता. शमाचा व्यवसाय चांगला सुरु असल्यामुळे तिची कमाईसुद्धा वाढली. त्यामुळे चंदाचा जळफळाट होत होता. चंदा ही २० नोव्हेंबरला शमा यांच्या घरी आली. तिने शमाशी वाद घालून तिच्या चारित्र्यावर संशय घेतला. तिला अश्लील भाषेत शिविगाळ केली. विनाकारण अपमानजनक बोलल्यामुळे शमा नैराश्यात गेली. तिने २१ नोव्हेंबरला सकाळी साडेसहा वाजता घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.
पोलिसांनी तपास सुरू केला असता शमा यांचा मोबाईल ताब्यात घेतला. त्यामधील फोटो आणि छायाचित्र तपासले असता, पोलिसांनी तीन व्हिडीओ सापडले. शमा यांनी ते आत्महत्या करण्यापूर्वी तयार केले होते. ‘चंदा पालीवाल हिने माझ्यावर खोटा आरोप लावला. माझ्या चारित्र्यावर संशय घेतला. त्यामुळे मला मानसिक धक्का बसला आहे. माझ्या आत्महत्येस चंदा हीच जबाबदार आहे.’ असा उल्लेख व्हिडिओत केला. पोलिसांनी चौकशीअंती चंदाविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला असून तिला अटक केली आहे.