नागपूर : लग्नाचा वाढदिवस साजरा  केल्यानंतर दोन दुचाकींनी घराकडे परत येताना विचित्र अपघात झाला. या अपघातात  गंभीर जखमी  आजी व नातवाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली. अपघातात एका व्यक्तीचा हाताचे हाड तुटले. या अपघातात कुटुंबातील अन्य दोघे किरकोळ जखमी झाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रभाबाई प्रभाकर धनवटे (५०) आणि हर्ष नितीन तुरकर (१०) असे या अपघातात मृत्यू झालेल्या आजी-नातवाचे नाव आहे. रविवारी १६ फेब्रुवारीला गौतम वासुदेवरांजी धनवटे (३७, रा. रेल्वे स्टेशन रोड, आंबेडकर चौक, कळमेश्वर) यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. त्यामुळे ते आपली दुचाकी क्रमांक (एम. एच. ४०, डि. एस-७४२२) ने पत्नी तृणाली गौतम धनवटे (३०) व मुलगी प्रांजली (१०) यांच्यासह नागपुरात राहत असलेले आपले मोठे भाऊ मुकेश धनवटे (रा. समतानगर भूमी ले आऊट) यांच्या घरी आले होते. त्यांच्यासोबत त्यांची पुतणी पायल नितीन तुरकर (३०) व तिचा मुलगा हर्ष तुरकर (१०) व गौतम धनवटे यांची काकू प्रभाबाई प्रभाकर धनवटे (५०) हे ॲक्टीव्हा( क्र. एम. एच. ४०, सि. एन-६२३९) ने नागपुरात आले. लग्नाचा वाढदिवस आटोपून सर्वजन रात्री ११ वाजता आपल्या दुचाकीने कळमेश्वरला परत जात होते. दरम्यान गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत काटोल रोडवर नवीन काटोल नाक्याच्या पुढे गोरेवाडा येथे कळमेश्वरकडून भरधाव वेगाने येणाऱ्या मालवाहु पिकअप वाहन क्रमांक (एम. एच. ४०, ए. के. ३५९०) चा  चालक नवीन रामजी पानसे (२७, रा. खापरी, पो. घोराड, ता. कळमेश्वर) याने  पायलच्या ॲक्टीव्हाला धडक दिली. यात पिकअप वाहन उलटले व ते गौतम यांच्या वाहनाला धडकले. त्यामुळे दोन्ही दुचाकीवरील सर्वजण गंभीर जखमी झाले.

रुग्णालयात नातेवाईकांचा आक्रोश

पोलिसांनी जखमींना उपचारासाठी मेयो रुग्णालय व तेथून मेडिकलच्या ट्रामा सेंटरमध्ये दाखल केले. परंतु उपचारादरम्यान डॉक्टरांनी सोमवारी पहाटे ५.१५ वाजता प्रभाबाई यांना तर सकाळी ८.२० वाजता चिमुकल्या हर्षला तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी आरोपी पिकअप वाहनचालकाविरुद्ध कलम २८१, १२५ (अ), १२५ (ब), सहकलम १८४, १८५ नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Accident while returning from celebrating wedding anniversary adk 83 amy