वर्धा : बिहारप्रमाणेच महाराष्ट्रातही ओबीसी समाजाचा डेटा तयार करण्याची मागणी राज्य शासनाकडे करणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. भाजपच्या ओबीसी जागर मेळाव्याचे आयोजन हिंगणघाटलगत करण्यात आले होते. जागर यात्रेची सुरुवात आज सेवाग्राम आश्रमातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवी झेंडी दिल्यानंतर झाली.
हेही वाचा >>> यात्रा काढून भाजपने ओबीसी जनगणनेपासून पळ काढू नये, विरोधी पक्ष नेते वडेट्टीवार आक्रमक
विदर्भातील नऊ लोकसभा क्षेत्रातून ही यात्रा फिरणार आहे. मेळाव्यास संबोधताना बावनकुळे पुढे म्हणाले की, बिहारमध्ये सर्व समाजाचा डेटा तयार करण्यात आला आहे. तसाच डेटा महाराष्ट्रात व्हावा म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्याकडे मागणी करणार असल्याचे ते म्हणाले. राज्यात ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय तसेच त्यांना राजकीय आरक्षण देण्याचे व ते वाचविण्याचे काम फडणवीस यांनी केले. केंद्रातील मोदी सरकारने विविध योजनांच्या माध्यमातून ओबीसींचे हीत साधले. ही यात्रा केंद्र व राज्य सरकारच्या ओबीसींसाठी असलेल्या विविध योजनांचा जागर करणार आहे. या प्रवर्गात सामील असणाऱ्या साडे तीनशेहून अधिक उपजातींना न्याय मिळवून देण्याचे काम ही यात्रा करेल. केंद्राने ओबीसींसाठी भरीव कार्य केले आहे.
हेही वाचा >>> ‘नवनीत राणांच्या विरोधात वंचित आघाडी उमेदवार देणार’; सुजात आंबेडकर यांची घोषणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओबीसी समाजातील घटकांना वैद्यकीय शिक्षण, नवोदय विद्यालय, किसान सन्मान निधी आदी स्वरूपात न्याय मिळवून दिला. त्यांच्याच कार्यकाळात भारत चंद्रावर पोहचला व सूर्याकडे जात आहे, असे सांगतानाच काँग्रेस सरकारने कधीही ओबीसी समाजाला न्याय दिला नाही, अशी टीकाही बावनकुळे यांनी केली. यावेळी राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, राष्ट्रीय महामंत्री खासदार संगमलाल गुप्ता, खासदार रामदास तडस, ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष संजय गाते, ओबीसी मोर्चाचे प्रभारी डॉ.आशिष देशमुख, संघटन सचिव डॉ.उपेंद्र कोठेकर व अन्य प्रामुख्याने उपस्थित होते.