नागपूर : नागपूरजवळील बाजारगाव येथे असलेल्या सोलर एक्सप्लॉसिव्ह कंपनीत स्फोट झाला. या स्फोटात ९ जण ठार, तर ३ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या कारखान्यात मोठ्या प्रमाणावर दारुगोळा तसेच रसायने असल्यामुळे यात मोठी जीवितहानी झाल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. या स्फोटाची तीव्रता नेमकी किती होती याची अद्याप माहिती समोर येऊ शकलेली नाही. पोलिसांचे पथक तेथे पोहोचले असून आतमध्ये पोहोचून स्थिती स्पष्ट होऊ शकेल, अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांनी दिली.

हेही वाचा – महिला अत्याचारविरोधातील ‘शक्ती कायदा’ बारगळणार; अनेक तरतुदींना केंद्राचा आक्षेप

हेही वाचा – वर्धा : दोन पोलीस निलंबित तर दोघांची बदली, काय आहे प्रकरण वाचा…

या स्फोटाचे नेमके कारण समोर आले नसून पोलीस चौकशी करीत आहेत. मृतांमध्ये ६ पुरुष तर ३ महिलांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

मृतांमध्ये ३ पुरुष व ६ महिलांचा समावेश

युवराज किशनजी घारोडे, ओमेश्वर किशनलाल मच्छिर्के, मिता प्रमोद उईके, आरती निलकांता सहारे, स्वेताली दामोदर मारबते, पुष्पा श्रीरामजी मानपुरे, भाग्यश्री सुधाकर लोणारे, रुमिता विलास उईके आणि मोसम राजकुमार पाटले यांचा मृतांमध्ये समावेश आहे. मृतांमध्ये वर्धा येथील २, चंद्रपूर येथील एक आणि अमरावती येथील एक जण रहिवाशी आहे. तर पाच जण हे नागपूरमधील रहिवाशी आहेत.

कंपनीबाबत थोडक्यात…

सोलार ग्रुपच्या वेबसाईटवरील माहितीनुसार, सत्यनारायण नंदलाल नुवाल यांनी सोलर ग्रुपची १९९५ मध्ये स्थापना केली. ही कंपनी जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त औद्योगिक स्फोटक उत्पादनासाठी ओळखली जाते. कंपनीत संरक्षण क्षेत्रासाठी लागणाऱ्या दारुगोळ्यासाठी एकात्मिक सुविधा आहे. ३ लाख मेट्रिक टन स्फोटकांचे वार्षिक उत्पादन पार करणारी सोलार ग्रुप ही देशातील पहिली कंपनी आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडलेल्या २० जिलेटीन कांड्या म्हणजेच ‘ईमलशन एक्सप्लोसिव्ह’ ही स्फोटके याच कंपनीत निर्मित झाल्याची माहिती समोर आली होती. २०१८ मध्येही या कंपनीमध्ये स्फोट झाला होता. त्यावेळी एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता. स्फोटानंतर ग्रामस्थांनी केलेल्या आंदोलनामुळे येथे तणाव निर्माण झाला होता.

आज झालेल्या स्फोटातील जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. स्फोटाची दुर्घटना घडल्याची माहिती मिळताच कामगारांच्या नातेवाईक व नागरिकांनी कंपनीबाहेर गर्दी केली आहे. कंपनीत किती कामगार काम करत होते, याची माहिती समोर आली नाही.

नागपुरातील घटना अतिशय दुर्दैवी – देवेंद्र फडणवीस

नागपुरातील सोलार इंडस्ट्रीजमध्ये झालेल्या स्फोटात ६ महिलांसह ९ लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी मृतकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे आहे. संरक्षण दलासाठी ड्रोन आणि स्फोटके तयार करणारी ही कंपनी आहे. नागपूर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्याशी सातत्याने संपर्कात असून स्वतः आयजी, एसपी, जिल्हाधिकारी घटनास्थळी आहेत. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना ५ लाख रुपये मदत राज्य सरकारतर्फे देण्यात येईल. त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटर एक्सवरून दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची दुर्घटनास्थळाला भेट, मृतांच्या नातेवाईकांचे केले सांत्वन

नागपूर बाजारगाव येथे स्फोट झालेल्या सोलार एक्सप्लोझिव्ह कंपनीला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी सायंकाळी भेट देऊन पाहणी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मृतांच्या नातेवाईकांचीही भेट घेऊन त्यांचेही सांत्वन केले. मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे. तसेच स्फोटाच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशीचे निर्देश दिले असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिली. जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, विशेष पोलिस महानरीक्षक यांच्यासह एनडीआरएफ व प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडून दुर्घटनेची आणि मदतकार्याची माहिती घेतली. मदतकार्य वेगाने पूर्ण करण्यात यावे तसेच जखमींवर शासकीय खर्चाने योग्य उपचार करावे, असे निर्देशही अजित पवार यांनी प्रशासनाला दिले. स्फोटाची घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगून पवार यांनी मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण केली तसेच मृतांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त केल्या.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Blast in an explosive manufacturing factory in bazargaon nagpur 9 died 3 seriously injured adk 83 ssb