शहरातील क्षयरुग्णांना पोषण किट देण्यासाठी रुग्णांचे पालकत्व स्वीकारण्याचे महापालिकेने आवाहन केल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शंभर रुग्णांचे पालकत्व स्वीकारले. शिवाय स्वयंसेवी संस्था आणि सेवाभावी नागरिकांद्वारे दत्तक घेण्यात आले असून त्या सर्व क्षयरुग्णांचा चाचणी अहवाल नकारात्मक (निगेटीव्ह) आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> आता वनखात्याचाही ‘बँड’, ऑनलाईन स्पर्धेची घोषणा

राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत २०२५ पर्यंत ‘क्षयरोग मुक्त भारत’ करण्याचा निर्धार केल्यानंतर महापालिकेने क्षयरोग झालेल्यांना दत्तक घेण्याचे आवाहन केले होते. त्याला अनेक दात्यांनी पुढे येऊन क्षयरुग्णांचे पालकत्व स्वीकारले. विशेष म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शंभर रुग्णांचे पालकत्व स्वीकारले असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली. महापालिकेत झालेल्या एका कार्यक्रमात राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन दिनाच्या अनुषंगाने ‘क्षयरोग मुक्त भारत’ अभियानाच्या अंतर्गत निक्षय मित्रांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राम जोशी म्हणाले, नागपूर शहर क्षयरोग मुक्त करण्यासाठी महापालिकेकडे सक्षम आरोग्य सुविधा उपलब्ध असल्याचे सांगितले. केंद्र शासनाच्या एका अहवालानुसार बहुतांशी क्षयरुग्ण कुपोषणाच्या विळख्यात असून त्यांना किमान ६ महिने उत्तम पौष्टिक आहार मिळाल्यास ते क्षयरोगमुक्त होऊ शकतात. त्यादृष्टीने महापालिकेद्वारे शहरातील सेवाभावी संस्था आणि नागरिकांना क्षयरुग्णांच्या पौष्टिक आहारासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. उपमुख्यमंत्र्याशिवाय सूद फाऊंडेशन, प्रगल्भ फाऊंडेशन, स्व. प्रभाकरराव दटके फाऊंडेशन यासह पगारिया परिवारासारख्या अनेक दात्यांनी पुढाकार घेतला. पगारिया परिवाराने तब्बल २५० रुग्णांचे पालकत्व स्वीकारले. पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांनी क्षयरुग्णांना पौष्टिक आहार देण्यासाठी १५ लाख रुपयांचा आमदार निधी जाहीर केल्याचेही जोशी यांनी सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dcm devendra fadnavis accepted guardianship of one hundred tuberculosis patients vmb 67 zws