नागपूर: ‘स्मार्ट प्रीपेड’ मीटरला सर्व स्तरातून विरोध होत असतानाही महावितरण हे मीटर उत्कृष्ट असल्याचे सांगत आहे. परंतु, या मीटरबाबत नागरिकांमधील रोष बघता महावितरणने स्वत:च्या कार्यालयासह वीज कर्मचारी गाळ्यांमध्ये प्रथम मीटर बसवल्याचे दर्शवून त्याबाबतच्या प्रसिद्धीपत्रकातून शिताफीने प्रीपेड शब्द वगळला आहे.

महावितरणच्या राज्यातील सर्व लघुदाब वर्गवारीतील २ कोटी ४१ लाख वीजग्राहकांकडे स्मार्ट प्रीपेड मीटर लावले जाणार आहेत. या मीटरबाबत महावितरणकडून सुरुवातीपासून गुणगाण गायले जात आहे. परंतु, या मीटरला नागरिकांचा विरोध वाढत आहे. नागपुरात विविध संघटना व राजकीय पक्षांनी प्रीपेड स्मार्ट मीटर विरोधी नागरिक संघर्ष समिती गठित करून एकत्रित लढा उभारण्याचेही जाहीर केले. त्यामुळे महावितरणने आपल्या प्रसिद्धीपत्रकातून प्रीपेड शब्द वगळला आहे. विशेष म्हणजे, मागील आठवड्याभरात महावितरणने काही प्रसिद्धीपत्रकांमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर असा पूर्ण उल्लेख केला होता. परंतु आता महावितरणच्या १८ कार्यालय व ३२३ सदनिकेत स्मार्ट मीटर बसवण्यात आल्याचे पत्रक प्रसिद्ध करून त्यातून प्रीपेड शब्द वगळला आहे. असे करून ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न दिसत आहे. याबाबत महावितरणच्या मुख्य जनसंपर्क विभाग कार्यालयाकडे विचारणा केली असता प्रतिक्रिया देण्यास नकार देण्यात आला.

आणखी वाचा-चंद्रपूर : तीन दिवसात उष्माघाताचे दहाहून अधिक बळी! माजी आमदार संजय धोटे यांचा आरोप

कोट्यवधींची उधळपट्टी कशाला?

“सर्वच स्तरातून स्मार्ट प्रीपेड मीटरला विरोध आहे. ग्राहकांना भ्रमित करण्यासाठी महावितरण आधी आपल्या कार्यालयात व कर्मचारी सदनिकांमध्ये मीटर लावत असल्याचे दाखवत आहे. परंतु आता प्रसिद्धीपत्रकातून प्रीपेड शब्द वगळून या ठिकाणी लागलेल्या मीटरचेही पोस्टपेड पद्धतीनेच देयक देणार आहे. मग, नवीन मीटरवर कोट्यवधींची उधळपट्टी कशाला केली जात आहे? ” -कृष्णा भोयर, राज्य सरचिटणीस, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन.

स्मार्ट प्रीपेड मीटर काय आहे ?

सध्या महावितरणद्वारे वीज ग्राहकांकडे स्मार्ट वीज मीटर लागले आहे. या मीटरमध्ये महिन्याला किती वीज वापरली त्याचे नियमित वाचन दर महिन्याला वीज कंपनीद्वारे नियुक्त कायम वा कंत्राटी कर्मचारी करतात. त्या आधारावर ग्राहकाला देयक पाठवले जाते. स्मार्ट प्रीपेड मीटर ‘मोबाइल’ रिचार्जप्रमाणे काम करणार आहे. जितके पैसे भरले तितकीच वीज ग्राहकांना वापरता येईल. या मीटरमध्ये आपण किती वीज वापरली याची माहिती ग्राहकाला क्षणात त्याच्या भ्रमणध्वनीवर ॲपच्या माध्यमातून बघता येईल. तसेच वीज वापरासाठीचे रिचार्ज कोठूनही करता येणार आहे. त्यामुळे ग्राहकाला वीजवापर कमी-जास्त करता येईल. सध्या वीज बिल थकले की ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला जातो. नव्या पद्धतीत या प्रकाराला आळा बसेल, असा दावा महावितरणकडून केला जातो.

आणखी वाचा-अमरावती विभागात विशिष्‍ट कापूस बियाण्‍याची टंचाई

स्मार्ट मीटर कसे काम करते?

नवीन प्रीपेड स्मार्ट मीटरमध्ये वीज ग्राहकांना रिचार्जच्या माध्यमातून प्रथम पैसे चुकते करावे लागेल व तेवढीच वीज त्याला मिळेल. विजेचा वापर जसा वाढेल, तसे पैसे संपत जातील. किती वीज वापरली व किती पैसे उरले याची माहिती ग्राहकाला त्यांच्या भ्रमणध्वनीवरील ॲपमध्ये दिसेल. ग्राहकाने भरलेले पैसे संपले की वीजपुरवठा स्वयंचलित पद्धतीने खंडित होईल. त्याने पुन्हा रिचार्ज केला तर पुरवठा सुरू होईल. घरबसल्या भ्रमणध्वनीवरून ऑनलाइन रिचार्ज करण्याचीही सुविधा राहील.