चंद्रपूर : नेतृत्व, लोकशाही, प्रशासन आणि शांतताप्रिय समाज निर्माण करण्यासाठी भारताच्या इतिहासामध्ये प्रथमच देशातील दोन हजारपेक्षा अधिक आमदार राष्ट्रीय विधायक संमेलनामध्ये एकत्रित येऊन एकाच व्यासपीठावर विचार विनिमय करणार आहेत. पुणे येथील एमआयटी स्कूल ऑफ गर्व्हमेंटतर्फे आयोजित ‘राष्ट्रीय विधायक संमेलन, भारत’ हे मुंबई येथील बीकेसी जीओ सेंटरमध्ये १५ जून ते १७ जून रोजी आयोजिले आहे. भारतातील सर्व विधानसभा व विधानपरिषदेचे अध्यक्ष व सभापती यांच्या सहकार्याने हे संमेलन होत असल्याची माहिती आमदार किशोर जोरगेवार यांनी दिली. राज्यातील सर्व पक्षातील आमदारांनी या संमेलनात सहभागी होऊन आपल्या लोकशाहीला अधिक सशक्त करण्यास योगदान द्यावे, असेही ते म्हणाले.
विश्रामगृह येथे आयोजित पत्रपरिषदेत संमेलन संयोजन समितीचे सदस्य योगेश पाटील, प्रकाश महाले, संजय गजपुरे व होमराज गजपुरे उपस्थित होते. राष्ट्रनिर्माण, राष्ट्रीय एकात्मता व राष्ट्रीय सर्वांगीण शाश्वत विकास या मध्यवर्ती विचार त्रिसुत्रीचा प्रमुख उद्देश ठेऊन हे संमेल्लन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाचा उद्घाटन सोहळा १६ जून रोजी होणार आहे. १७ जून रोजी या संमेलनाचा समारोप होईल. या व्यतिरिक्त ४० समांतर सत्र आणि गोलमेज परिषद होणार आहेत.
हेही वाचा – कान्हा व्याघ्रप्रकल्पातून दहा रानगव्यांना जेरबंद करून…
लोकसभेच्या माजी सभापती सुमित्रा महाजन, डॉ. मीरा कुमार, शिवराज पाटील चाकुरकर, मनोहर जोशी तसेच लोकसभा सभापती ओम बिर्ला हे या संमेलनाचे मार्गदर्शक व संयोजक आहेत. एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटचे संस्थापक अध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड यांच्या विचार चिंतनामधून ‘राष्ट्रीय विधायक संमेलन, भारत’ ही संकल्पना साकारली आहे. ते या संमेलनाचे प्रमुख संयोजक समन्वयक आहेत. संमेलनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, माजी सभापती दिलीप वळसे पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
या संमेलनात सार्वजनिक जीवनातील तणाव व्यवस्थापन, शाश्वत विकासाची साधने आणि प्रभाव, कल्याणकारी योजना. शेवटच्या व्यक्तीचे उत्थान, आर्थिक कल्याणासाठी तंत्रज्ञानाचा स्वीकार आणि कौतुकास्पद विधानपद्धती या विषयांवर चर्चा होणार आहे. आपला मतदारसंघ विकसित करण्याची कला आणि कौशल्य, आपली प्रतिमा तयार करणे, साधने आणि तंत्रे, विधिमंडळ कार्यप्रदर्शन, अपेक्षेनुसार जगणे आणि सामाजिक कल्याणासाठी सहयोग, नोकरशहा आणि आमदार या विषयांवर चर्चा होणार आहे.
हेही वाचा – बुलढाणा: मलकापूर शहरातील ‘मातोश्री जिनिंग’ ला आग; शेकडो क्विंटल कापूस जळाला
गोलमेज परिषदेत भारत २०४७ व आमचे लक्ष, सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांची चर्चा, राजकारणाचे अध्यात्मिकीकरण, अध्यात्मिक नेत्यांची चर्चा, अमृत कालमध्ये भारताचे परिवर्तन, व्यवसाय व उद्योग क्षेत्रातील लिडर्सची चर्चा, विधिमंडळाचे कामकाज आव्हाने आणि पुढील मार्ग सर्व राज्य विधानमंडळांच्या सचिवांची चर्चा होणार आहे. संमेलनासाठी भारतातील सर्व राज्यातील १८०० आमदारांनी होकार दर्शविला आहे, अशी माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली.