नागपूर : राज्यातील कोणत्याच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये रुग्णालय प्रशासन विभाग आणि अतिदक्षता विभाग नाही. त्यामुळे या विषयाचे तज्ज्ञच नसल्याने येथे रुग्णांचे मृत्यू कमी होणार कसे, हा खरा प्रश्न आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये रुग्णालय प्रशासन विभाग हा अभ्यासक्रम आणि या विषयातील तज्ज्ञांची नितांत गरज आहे. एमबीबीएसनंतर हा अभ्यासक्रम करणारे तज्ज्ञ हे रुग्णालयातील प्राणवायू, निर्जंतुकीकरण, डॉक्टर- कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसह रुग्णांवरील उपचाराशी संबंधित सर्व गोष्टींवर लक्ष ठेवतात. एखाद्या विभागात मृत्यू वाढल्यास त्यातही ते लक्ष घालतात. परंतु, हा विभाग व तज्ज्ञ सध्या एकाही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत नाहीत.

हेही वाचा – बच्चू कडू खंत व्यक्त करताना म्हणाले, “दिव्यांग मंत्रालय हा ऐतिहासिक निर्णय, पण…”

तत्कालीन वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील प्रतिनियुक्तीवरील वैद्यकीय अधीक्षक, उपअधीक्षकांचे काम काढून घेतल्यावर या विभाग व अभ्यासक्रमाची घोषणा करण्यात आली. परंतु पुढे काहीच झाले नाही. आता अतिदक्षता विभागातील अत्यवस्थ रुग्णांना हाताळण्यासाठी क्रिटिकल केअर मेडिसिनशी संबंधित डिप्लोमा, डीएम आणि डीएमआरबी अभ्यासक्रम उपलब्ध झाले आहेत. परंतु एकाही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत ते नाहीत. हे तज्ज्ञ (इंटेन्सिव्हिस्ट) २४ तास अतिदक्षता विभागात कार्यरत असतात. येथील अत्यवस्थ रुग्णांवरील औषधांसह व्यवस्थापनाचे त्यांना विशेष शिक्षण मिळालेले असते. परंतु, तेच नसल्याने सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील अतिदक्षता विभागात औषधशास्त्र, श्वसनरोग व इतर शाखेच्या तज्ज्ञांकडूनच उपचार केले जातात. परंतु, त्यांच्याही मर्यादा आहेत. त्यामुळे अतिदक्षता तज्ज्ञांची नियुक्तीच या समस्येवरचा उपाय आहे.

“अतिगंभीर रुग्णांना हाताळण्याचे कौशल्य क्रिटिकल केअर मेडिसीन अभ्यासक्रम करणाऱ्या अतिदक्षता तज्ज्ञांकडे असते. शासकीय रुग्णालयांत अतिदक्षता तज्ज्ञ नियुक्त झाल्यास मृत्यू काही अंशी कमी होऊ शकतात. सोबतच येथील प्रशिक्षित परिचारिका, इतर चमू व पायाभूत सोयींकडेही लक्ष देण्याची गरज आहे.” – डॉ. इम्रान नुरमोहम्मद, अध्यक्ष, सोसायटी ऑफ क्रिटिकल केअर मेडिसिन.

हेही वाचा – नितीन गडकरीचे ट्विट, बस बांधणीची सुधारित मानके मंजूर, गुणवत्तेत होणार सुधारणा..  

“इंडियन सोसायटी ऑफ क्रिटकल केअर मेडिसीनकडून राज्यातील अतिदक्षता विभागातील ४ हजार ७०० रुग्णांचा अभ्यास करण्यात आला. त्यात या रुग्णांमध्ये मृत्यूचे प्रमाण १५.८ टक्के आढळले. अतिगंभीर तर ७.६ टक्के रुग्णांना नातेवाईक त्यांच्या जोखमेवर घरी घेऊन गेले.” – डॉ. अजय बुल्ले, अतिदक्षता तज्ज्ञ, मेडिट्रिना रुग्णालय, नागपूर.

“मिरजच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सर्वात आधी ‘इमरजेंसी मेडिसीन’मध्ये अभ्यासक्रम सुरू करण्यात आला. परंतु राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाकडून (एनएमसी) काही तांत्रिक बदल झाले आहेत. त्याबाबत स्पष्टता आल्यावर राज्यभरात हा अभ्यासक्रम सुरू केला जाईल. रुग्णालय प्रशासन विभागाचा अभ्यासक्रमही एनएमसीचे निकष बघून सुरू करण्याचा प्रयत्न असेल. सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अतिदक्षता विभागात ज्येष्ठ डॉक्टर सेवा देत असल्याने रुग्णांवर सर्वोत्कृष्ट उपचार होतात.” – डॉ. दिलीप म्हैसेकर, संचालक, वैद्यकीय शिक्षण विभाग, मुंबई.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: None of the government medical colleges in maharashtra have hospital administration department and intensive care department mnb 82 ssb