नागपूर : रेल्वेगाड्यांची टक्कर टाळण्यासाठी ‘कवच’ ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे. परंतु महाराष्ट्रात सर्वदूर पसरलेला मध्य रेल्वे विभाग अद्याप या प्रणालीपासून लांबच आहे. कवच ही एक स्वयंचलित (एटीपी) प्रणाली आहे. चालकाने वेळेवर ‘ब्रेक’ लावला नाही तर गाडीचा वेग नियंत्रित करणे हे या प्रणालीचे काम आहे. कवचद्वारे चालकांना रेल्वे मार्गावरील धोक्याचे सिग्नल ओळखण्यात मदत मिळते. कमी दृश्यमानतेच्या ठिकाणी गाडी चालवण्यासही मदत होते.

कवच प्रणाली ज्या मार्गावर कार्यान्वित केली जाते, त्या मार्गावरील गाडी सुरक्षितपणे जाऊ देण्यासाठी ५ किलोमीटरच्या आत असलेल्या सर्व गाड्या थांबवल्या जातात. रेल्वे इंजिनमध्ये असलेल्या डिजिटल बोर्डवरील सूचनांचा वापर करून चालक अधिक अचूकतेने धोक्याचे सिग्नल वाचू शकतो. मध्य रेल्वेचे महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नागपूर, भुसावळ, सोलापूर असे विभाग आहेत. परंतु अद्याप त्यांना ‘कवच’चे संरक्षण लाभलेले नाही.

हेही वाचा – बुलढाणा : कडेकोट बंदोबस्तात पोलीस भरतीला प्रारंभ; गुप्तचर, एसीबी अन्…

कवच प्रणाली १० हजार किमीच्या मार्गावर स्थापित करण्यासाठी निविदा काढण्यात आल्या आहेत. आतापर्यंत, दक्षिण मध्य रेल्वेतील १३९ इंजिनवर (लोकोमोटिव्ह) ही प्रणाली बसवण्यात आली आहे.

सोमवारी पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्यात मालगाडीने कांचनगंगा एक्स्प्रेसला धडक दिल्यानंतर ‘कवच’ प्रणाली पुन्हा चर्चेत आली आहे. इंजिनांमध्ये ही प्रणाली बसविल्यानंतर असे अपघात होणार नसल्याचा दावा रेल्वेने वारंवार केला आहे. मात्र राज्यातील बहुतांश गाड्या या टक्करविरोधी प्रणालीशिवाय धावत असल्याचे ताज्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा – एमएचटी-सीईटीच्या निकालातील गुणवाढीमुळे ‘या’ शाखांमध्ये प्रवेशासाठी गर्दी वाढणार; अशी आहे राज्यातील प्रवेशाची स्थिती

कवच ही प्रणाली मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते हावडा मार्गावर सर्वप्रथम बसवण्याचे नियोजन आहे. त्यानंतर इतर ठिकाणी टप्प्याटप्प्याने ती कार्यान्वित करण्यात येईल. त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे. पुढील दोन-तीन वर्षांत हे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. – डॉ स्वप्निल डी. नीला, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे.