यवतमाळ : येथील बंद असलेल्या ब्रिटीशकालीन शकुंतला रेल्वेचे ब्रॉडगेजमध्ये रुपांतर करण्यात यावे, अशी मागणी खासदार अनिल बोंडे यांनी आज, बुधवारी राज्यसभेत केली. या रेल्वेमार्गासाठी राज्य शासनाने यापूर्वीच निधीची तरतूद केली होती. मात्र नुकत्याच सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात या रेल्वेमार्गासाठी कोणतीही तरतूद करण्यात आली नाही. त्यामुळे खासदार बोंडे यांनी आज उपस्थित केलेल्या शकुंतला रेल्वेच्या ब्रॉडगेजचा मुद्दा महत्वाचा ठरला.

स्वातंत्र्यपूर्व काळात विदर्भातील कापूस मँचेस्टरकडे निर्यात करण्यासाठी यवतमाळ-मूर्तिजापूर-अचलपूर ही नॅरोगेज रेल्वे सुरू करण्यात आली. पुढे तिला लोकांनीच ‘शकुंतला’ हे नाव बहाल केले आणि याच नावाने ही रेल्वे जगभर प्रसिद्ध झाली. क्लिक निक्सन या ब्रिटिश कंपनी अंतर्गत येणाऱ्या सीपी रेल्वे कंपनीकडून ही रेल्वे चालवण्यात येत होती.

हेही वाचा – अमरावती : ‘विदेशी नोटा भारतीय चलनात बदलून देता का?’ आंतरराज्‍यीय टोळीतील तीन महिला…

१९५२ मध्ये सर्व रेल्वे यंत्रणेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. मात्र यवतमाळ – मूर्तिजापूर – अचलपूर आणि आर्वी – पुलगाव हा शकुंतला रेल्वेमार्ग राष्ट्रीयकरणापासून वंचित राहिला. सीपी रेल्वे कंपनीशी असलेला करार संपुष्टात आला आणि या रेल्वे मार्गावर धावणारी शकुंतला रेल्वे बंद पडली.
या रेल्वेमार्गाचे पुनरुजीवन करण्याची मागणी सर्व विदर्भातून होत आहे. शकुंतला रेल्वे विकास समिती आणि अनेक संघटना त्यासाठी आंदोलन करत आहेत. या मागणीला अनुसरून यवतमाळ-मूर्तिजापूर-अचलपूर या नॅरोगेज मार्गाचे रेल्वे मंत्रालयाने ब्रॉडगेजमध्ये रुपांतरण करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी राज्यसभेत केली. या नॅरोगेज रेल्वेमार्गाचे रुपांतरण ब्रॉडगेजमध्ये करणे सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरेल.

या रेल्वे मार्गाच्या उपलब्धतेमुळे औद्योगिक विकास तसेच कृषी उत्पादनाचे परिवहन सुलभ होईल. शिवाय पुणे, मुंबई आणि दिल्लीसाठी हा रेल्वेमार्ग थेट जोडल्या जाईल. या रेल्वेमार्गाचे रुपांतरण ब्रॉडगेजमध्ये करण्यासाठी (काही भाग वगळता) भूमी अधिग्रहणाची आवश्यकता नाही. रेल्वे मंत्रालयाकडे पर्याप्त जमीन उपलब्ध आहे. या रेल्वेमार्गात काही तांत्रिक अडचणी होत्या. परंतु त्या देखील आता संपुष्टात आल्या आहेत, असे खासदार बोंडे भाषणात म्हणाले. शकुंतला रेल्वेमार्ग सुरू होणे ही मागास भागाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण घटना असेल. त्यामुळे सरकारकडून याबाबत सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा खासदार अनिल बोंडे यांनी राज्यसभेत व्यक्त केली.

हेही वाचा – भाजप आमदार श्वेता महालेंच्या बॉडीगार्डने स्वतःवर झाडली गोळी

शकुंतला रेल्वेमार्गाच्या गेज परिवर्तनाविषयी अनेकांकडून पाठपुरावा सुरू आहे. राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पात यवतमाळ – मूर्तिजापूर रेल्वेमार्गासाठी राज्य शासनाने ५० टक्के निधीची आर्थिक तरतूद केली होती. खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी शकुंतला रेल्वे विकास समितीच्या पाठपुराव्याचा उल्लेख करत राज्यसभेत आज हा मुद्दा उपस्थित केला. शकुंतला रेल्वेमार्गाच्या गेज परिवर्तनासाठी रेल्वे मंत्रालयाने विशेष प्रकल्पाचा दर्जा द्यावा तसेच या रेल्वे मार्गाचा विस्तृत प्रकल्प अहवाल (डीपीआर) लवकरात लवकर बनवावा, अशी प्रतिक्रिया शकुंतला रेल्वे विकास समितीचे समन्वयक अक्षय पांडे यांनी दिली.