पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी (११ डिसेंबर) मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचं उद्घाटन केलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वागत करण्याचा मान गजवक्र नावाच्या ढोलताशा पथकाला मिळाला होता. यावेळी मोदींनी स्वतः या पथकातील एक वादकाच्या खांद्यावर हात ठेऊन ढोलवादनाचा आनंद घेतला. तसेच या मुलाशी संवादही साधला. अमित विजय वेधे असं या ढोल वाजवणाऱ्या मुलाचं नाव आहे. त्या दोघांमध्ये नेमका काय संवाद झाला याविषयी त्या मुलाला विचारण्यात आलं. तेव्हा त्याने याविषयी माहिती दिली. तो एबीपी माझाला दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मोदी काय बोलले या प्रश्नावर ढोलवादक मुलगा म्हणाला, “ते माझ्याकडे आले आणि तुझी काठी मला दे असं म्हटले. मी त्यांना सांगितलं की याला काठी म्हणत नाही, तर टिपरू म्हणतात. त्यानंतर त्यांनी हे टिपरू घेऊन ढोल वाजवला. त्यावेळी त्यांनी मलाही दुसऱ्या बाजूने वाजव म्हटलं. तसेच मजा येतेय का विचारलं. मी हो म्हटलं.”

“मोदी आमच्याकडे येऊन ढोल वाजवतील असं वाटलं नव्हतं”

“मोदींबरोबर ढोल वाजवल्याने फार छान वाटलं. पथकालाही खूप आनंद झाला. मोदी आमच्याकडे येऊन ढोल वाजवतील असं वाटलं नव्हतं. मात्र, ते आले आणि त्यामुळे आम्हाला फार छान वाटलं,” असंही या मुलाने नमूद केलं.

“आज संकष्टी चतुर्थी आहे,” मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात

मोदींनी समृद्धी महामार्ग उद्घाटन करताना शिंदे-फडणवीस सरकारचं कौतुक केलं. तसेच डबल इंजिन सरकार वेगाने काम करत असल्याचं म्हटलं. यावेळी मोदींनी मराठीत आपल्या भाषणाची सुरुवात करताच उपस्थितांनी टाळ्या वाजवत कौतुक केलं. विकासकामांचं उद्धाटन करताना आपल्या आनंद होत असल्याची भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.

“महाराष्ट्राच्या विकासासाठी ११ तारका उदयाला येत आहेत”

“आज संकष्टी चतुर्थी आहे. कोणतंही शुभकाम करताना आपण प्रथम गणेशपूजन करतो. आज नागपुरात असल्याने टेकडीच्या गणपती बाप्पाला माझं वंदन,” अशी मराठीत मोदींनी सुरुवात करताच उपस्थितांनी टाळ्या वाजवत कौतुक केलं. आज महाराष्ट्राच्या विकासासाठी ११ तारका उदयाला येत आहेत असं नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. हे महानक्षत्र महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा, ऊर्जा देईल असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा : “…अशा राजकीय नेत्यांना उघडं पाडा”, नागपुरात नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल, म्हणाले “ही विकृती आहे”

“स्वातंत्र्याला ७५ वर्षांच्या अमृत महोत्सवात ७५ हजार कोटींच्या या विकासकामांसाठी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या जनतेचं अभिनंदन. आजच्या या विकासकामांमधून डबल इंजिन सरकार महाराष्ट्रात वेगाने काम करत असल्याचं दर्शवत आहे. समृद्धी महामार्गामुळे नागपूर आणि मुंबईतील अंतर कमी होईलच, पण २४ जिल्ह्यांना जोडत आहे. यामुळे शेतकरी, भाविक, उद्योगांना मोठा फायदा होईल. रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील,” असं नरेंद्र मोदींनी सांगितलं.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Young boy who beat dhol with pm narendra modi in nagpur comment about experience pbs