शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर ‘अॅक्शन मोड’मध्ये आलेले दिसत आहेत. मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने जिल्हा नियोजन समितीच्या ५६७ कोटी रुपयांच्या कामांना स्थगिती दिली आहे. घाईघाईत या कामांना मंजुरी का? असा प्रश्न उपस्थित करत शिंदे-फडणवीस सरकारने हा निर्णय घेतला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एकनाथ शिंदे यांनी नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना या विषयावरून फैलावर घेतलं आहे. कार्यसमितीची बैठक घेऊन घाईने या कामांना मंजुरी का देण्यात आली, असा सवाल शिंदेंनी केलाय. तसेच ५६७ कोटी रुपयांच्या जिल्हा नियोजन समितीच्या कामांना स्थगिती देण्यात आली. हा माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना मोठा धक्का मानला जात आहे.

आधी शिवसेनेला धक्का, आता राष्ट्रवादीला झटका

शिंदे-फडणवीस यांनी सत्तास्थापनेनंतर लगेचच निर्णयांवर भर दिला आहे. ज्या दिवशी शपथ घेतली त्याच दिवशी शिंदे-फडणवीसांनी मुंबई मेट्रोच्या आरे कारशेडला मान्यता देत शिवसेनेला धक्का दिला. फडणवीस सरकारच्या काळात आरे जंगलात मेट्रो कारशेड तयार करण्याचा निर्णय वादग्रस्त ठरला होता.

हेही वाचा : आशिष शेलार यांची एकनाथ शिंदेंनी सांभाळलेल्या नगरविकास खात्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका

त्यावेळी मुंबईकरांनी उत्स्फुर्तपणे याला विरोध केला. या विषयात शिवसेनेनेही उडी घेत या मागणीला पाठिंबा दिला. महाविकासआघाडी सरकार आल्यानंतर आरेमधील प्रस्तावित कारशेड कांजूरमार्ग येथे हलवण्यात आली. मात्र, शिंदे-फडणवीस सरकारने पुन्हा हा निर्णय फिरवला आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm eknath shinde stop 567 crore work of nashik dpc chhagan bhujbal pbs