नाशिक: शहराजवळील शिंदे गाव परिसरातील फटाक्याच्या गोदामाला मंगळवारी दुपारी अकस्मात लागलेल्या आगीत मालमोटारीसह गोदामातील फटाके भस्मसात झाले. या घटनेत दोन जण जखमी झाले. आग नियंत्रणात येईपर्यंत म्हणजे दीड ते दोन तास परिसरात अखंडपणे फटाक्यांचा दणदणाट सुरू होता. या दुर्घटनेत दीड ते दोन कोटींचे आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

शिंदे गाव-नायगाव रस्त्यावरील श्री स्वामी समर्थ ट्रेडर्स या फटाक्याच्या गोदामात ही घटना घडली. तामिळनाडूच्या शिवकाशी येथून माल घेऊन गोदामात मालमोटार आली होती. माल उतरवला जात असताना दुसरीकडे चालक, सहचालक हे जेवण बनवित असताना ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जाते. गोदामातील कर्मचाऱ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु, एका पाठोपाठ फुटणारे फटाके आणि धुराचे प्रचंड लोळ यामुळे अडचणी आल्या. यावेळी दोन कर्मचारी जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे चार ते पाच बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शर्थीने आग विझविण्याचे प्रयत्न केले.

हेही वाचा : नाशिक: नियमबाह्य कामे केल्यास कारवाई; विभागीय सचिवांचा मुख्याध्यापक, प्राचार्यांना इशारा

जेसीबीच्या सहाय्याने गोदामातील पत्रे हटविण्यात आले. दीड ते दोन तासानंतर आग विझविण्यात यश आले. परंतु, तोपर्यंत मालमोटार आणि गोदामातील सर्व फटाके आगीच्या स्वाधीन झाले होते. फटाक्यांचे हे गोदाम गौरव विसपुते यांच्या मालकीचे असल्याचे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले.

तामिळनाडू येथून आलेल्या मालमोटारीत मोठ्या प्रमाणात माल होता. काही माल नाशिकला उतरवून मालमोटार उर्वरित माल घेऊन मुंबईला वितरणासाठी जाणार होती. मालमोटारीतील चालक आणि सहचालक भोजन बनवत असताना आधी कक्षाला आग लागून मालमोटार आणि गोदामातील फटाके सर्व आगीच्या विळख्यात सापडल्याचे कर्मचारी व प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात आले.