लोकसत्ता वार्ताहर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

धुळे: नायब तहसीलदारांच्या वेतनश्रेणीत वाढ करण्यात यावी, या मागणीसाठी राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेतर्फे सोमवारपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले असल्याची माहिती संघटनेच्या धुळे शाखेचे अध्यक्ष प्रथमेश घोलप यांनी दिली आहे.

नायब तहसीलदारांची वेतनश्रेणी वाढविण्यासंदर्भात राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेतर्फे १९९८ पासून शासनाकडे वारंवार पाठपुरावा करण्यात येत आहे. मध्यंतरीच्या काळात के.पी. बक्षी यांच्या अध्यक्षतेखाली वेतन त्रुटी समितीने देखील नायब तहसीलदार यांच्या वेतनश्रेणीसंदर्भात सादरीकरण केले आहे. कामाचे स्वरुप, जबाबदारी याविषयी वारंवार माहिती देवूनही मागणीचा विचार करण्यात आला नाही. या पार्श्वभूमीवर संघटनेने राज्यव्यापी कामबंद आंदोलनाची भूमिका घेतली आहे.

यासंदर्भात तीन मार्च रोजी जिल्हाधिकार्‍यांमार्फत शासनास आंदोलनाबाबत निवेदन देण्यात आले. १३ मार्च रोजी एक दिवसीय रजा घेवून विभागीय आयुक्त कार्यालय येथे धरणे आंदोलन करण्यात आले.आता आंदोलनाचा अखेरचा टप्पा म्हणून तीन एप्रिलपासून राज्यभर बेमुदत कामबंद आंदोलन सुरू झाले आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Naib tehsildars no work strike in dhule mrj