नवी मुंबई : गुगल किंवा युट्युब वर लाईक सबस्क्राईब करा आणि लाखो रुपये मिळवा अशा जाहिरातींना बळी पडू नका अशी जनजागृती पोलीस विभाग करत असतो मात्र तरीही याला बळी पडून पैसे कमावणे तर दूर उलट तुमच्या खिशात सायबर गुन्हेगार हात घालून पैसे कधी घेऊन जातील कळणार नाही. या शिवाय सट्टा बाजारात पैसे गुंतवा चौपट पाचपट परतावा मिळवा अशा जाहिरातीला बळी पडून २० लाखांची फसवणूक झाली आहे. दोन्ही प्रकार  नवी मुंबईत समोर आले  आहे. 

नवी मुंबईतील सानपाडा येथे राहणाऱ्या एका ४१वर्षीय व्यक्तीच्या व्हाटस अप वर एक संदेश आणि सोबत लिंक आली. त्यात आम्ही पाठवले गुगल वरील बेबलिंक , युट्युब लिंकला लाईक सबस्क्राईब करा आणि रेटिंग द्वारे पैसे कमवा अशा आशयाची जाहिरात आली होती. फिर्यादी यांनी लिंकवर क्लिक करताच टेलिग्राम गुगल रेटिंग बेबलिंक द्वारे त्यांचा समावेश एका व्हाट्सअप समूहात झाला. यात रेटिंग जमा झाल्यावर पैसे मिळतील मात्र त्यासाठी विविध कर आणि आगाऊ रक्कम जमा करावी लागेल असे सांगितले. तसेच वेळोवेळी असेच आमिष दाखवून २ जानेवारी ते ५ जून दरम्यान तब्बल २० लाख ८५ हजार रुपये विविध बँक खात्यात भरण्यास भाग पाडले. हे सर्व व्यवहार ऑन लाईन सुरु होते. यात एलव्हीशा नावाच्या कंपनीचे सिनियर रिसेप्शनिस्ट अशी ओळख सांगणारे शर्मा एल्विस हे फिर्यादी यांच्या संपर्कात होते. आपली फसवणूक होत असल्याची खात्री पटल्यावर फिर्यादी यांनी सानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पुढील तपास सायबर पोलीस करीत आहेत.

दुसऱ्या घटनेत नवी मुंबईतील आग्रोळी गावात राहणाऱ्या एका ४३ वर्षीय व्यक्तीला सट्टा बाजारात पैसे गुंतवा अल्पवधीत पैसे कमवा असे आमिष दाखवून त्याच्या कडून २७ डिसेंबर ते ५ मे दरम्यान २० लाख ३५ हजार ६८८ रुपयांची फसवणूक केली गेली. या प्रकरणी फिर्यादी यांच्याशी संपर्क साधणारे प्रीती जाधव , मानव अवस्थी, नम्रता देसाई, अविनाश जाधव, कीर्ती मॅडम, मान्यता कदम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या गुन्ह्यांची नोंद ५ तारखेला झाली तर त्याच्या एक दिवस अगोदरच ऑन लाईन फसवणुकीचे दोन वेगवेगळ्या घटनेत २ कोटी २८ लाखांची फसवणूक केल्याची नोंद सायबर पोलिसांकडे झाली आहेत. ऑनलाईन फसवणूक गुन्हे पद्धतीत एका फिर्यादीला सट्टा बाजारातील गुंतवणुकीवर भरघोस परताव्याचे आमिष दाखवून २ कोटी २० लाखांची फसवणूक केली गेली तर  तर दुसऱ्या घटनेत डिजिटल अटक दाखवून ८ लाखांची फसवणूक करण्यात आली आहे.