लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवी मुंबई: नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने जलजागृती सप्ताहाचे १६ ते २२ मार्च २०२३ या कालावधीत विविध उपक्रमांच्या माध्यमातून आयोजन करण्यात आले होते. शहरात ठिकठिकाणी जलजागृती सप्ताहाचे होर्डींग प्रसारित करण्यात आले. हस्तपत्रके वितरित करण्यात आली. शहरातील विविध ठिकाणी असलेल्या एलईडी स्क्रीन्सवर जलबचतीचा संदेश प्रसिध्द करण्यात आला. अशा विविध प्रकारे संदेश प्रसारित करण्यासोबतच पाण्याचे महत्व विदयार्थ्यांना लहान वयापासूनच कळावे याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेच्या सर्व ७९ शाळांमध्ये जलबचत विषयक विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

महानगरपालिकेच्या ५६ प्राथमिक व २३ माध्यमिक शाळांमधील अनेक विद्यार्थ्यांनी आकर्षक हस्तफलक तयार करून त्यावर जलबचतीचे संदेश रेखाटले. काही शाळांमध्ये पाण्याचे महत्व पटवून देणाऱ्या विषयांवर चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले होते. विदयार्थ्यांवर जलबचतीचे संस्कार करण्यासोबतच पालकसभा घेऊन पाणी बचतीचा संदेश प्रसारित करण्यात आला. अनेक शाळांनी आपापल्या परिसरात जलजागृती करणाऱ्या प्रभातफेऱ्या काढून ‘पाणी वाचवा, जीवन वाचवा’ अशा विविध प्रकारच्या घोषणा देत जनसामान्यांना पाण्याचे महत्व पटवून दिले.

आणखी वाचा- विवाहितेच्या आत्महत्येनंतर पती, ननंद आणि ‘तिच्या’ विरोधात गुन्हा दाखल

काही शाळांमध्ये पाणी बचतीवर भाषणे तर दोन शाळांमध्ये पारंपारिक कीर्तनेही सादर झाली. काही शाळांनी आपल्या परिसरातील मुख्य रस्त्यांवर तसेच मुख्य चौकांमध्ये जलजागृतीपर पथनाटये सादर केली. सर्व ७९ शाळांमधील वर्गावर्गामध्ये पाणीबचतीची सामुहिक जलप्रतिज्ञा घेण्यात आली. प्रतिज्ञेनंतर शिक्षकांनी विदयार्थ्यांना पाण्याचे महत्व सांगत पाण्याचा उपव्यय टाळणे, पाणी बचत याविषयी सविस्तर माहिती दिली. नवी मुंबई महानगरपालिका शाळांतील मुख्याध्यापक, शिक्षक, शाळेतील कर्मचारी, सुरक्षारक्षक, सफाई कर्मचारी तसेच ३५ हजारहून अधिक मुलांनी एकत्र येत जलबचतीचे महत्व अधोरेखित केले.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Students of municipal schools gave the message of water conservation mrj
First published on: 24-03-2023 at 18:22 IST