-
बॉलीवूड सुपरस्टार सलमान खान आणि त्याची कथित प्रेयसी लुलिया वेतुंर यांच्या प्रेमप्रकरणाच्या चर्चेने चांगलाच जोर धरला आहे. दोघंही वर्षाअखेरीस विवाहबद्ध होणार असल्याचाही अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पण अद्याप दोघांनी आपल्या नात्याबद्दल एक शब्दही उच्चारलेला नाही. दोघं एकमेकांसाठी कसे 'परफेक्ट' आहेत याची काही कारणं पुढील प्रमाणे…
-
लुलिया ही बॉलीवूडमध्ये एन्ट्री मिळविण्यासाठी सलमान खानचा आधार घेणाऱ्या अन्य उदयोन्मुख अभिनेत्रींसारखी नाही. मुळात लुलिया आणि सलमानची भेट ती भारत भेटीवर आली असताना झाली. लुलिया ही रोमानियात राहणारी असून ती टेलिव्हिजनवरील सूत्रसंचालक आहे. आत्तापर्यंत ‘ओ तेरी’ चित्रपटातील आयटम साँग वगळता लुलिया बॉलीवूड चित्रपटांमध्ये दिसलेली नाही.
-
एखादे नाते खुलण्यासाठी दोन्ही व्यक्तींच्या आवडीनिवडी जुळणे खूप महत्त्वाची बाब असते. याबतीत सलमान आणि लुलियाचे ३६ गुण मिळतायतं , असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. सलमानला शेती आणि घोडेस्वारीची आवड आहे. लुलियाही रोमानियातील टेलिव्हिजनवर शेतीसंबंधी एका कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करते. याशिवाय, सलमानच्या फार्महाऊसवर लुलिया अनेकदा घोडेस्वारी करताना दिसून आली आहे.
-
बॉलीवूड इंडस्ट्रीत नशीब उघडण्यासाठी किंवा ब्रेक मिळविण्यासाठी आजपर्यंत अनेक अभिनेत्रींनी सलमान खानचा आधार घेतला आहे. मात्र, लुलियाची आत्तापर्यंतची वाटचाल पाहता बॉलीवूडमध्ये करिअर करणे, ही तिची महत्त्वकांक्षा असेल असे वाटत नाही. त्यामुळे लुलिया आणि सलमान एकत्र राहण्याचे कारण केवळ प्रेम आणि प्रेमच असल्याचे सांगण्यात येत आहे.
-
लुलियाचे सलमान आणि तिच्या कुटुंबियांबरोबर असलेले भावनिक बंध हा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे. काही दिवसांपूर्वी पंजाबमधले ‘सुल्तान’चे चित्रीकरण आटपून सलमान आणि त्याची आई सलमा खान मुंबईत परतताना लुलिया त्यांच्याबरोबर होती. लुलिया सलमानच्या आईची यावेळी काळजी घेताना दिसून आली. त्यामुळे सलमानच्या आईला लुलिया सून म्हणून पसंत असल्याचे म्हटले जात आहे. याशिवाय, प्रिती झिंटाच्या विवाह सोहळ्याच्या स्वागत समारंभात या दोघांनी लावलेली एकत्रित हजेरीही बरेच काही सांगून जाते.
-
सलमान आणि लुलिया या दोघांनी आत्तापर्यंत वैयक्तिक आयुष्यात चढउतार बघितले आहेत. सलमानची प्रेमप्रकरणे हा बॉलीवूडमधील स्वतंत्र अध्याय आहे, तर लुलियाचा यापूर्वी संगीतकार मॉरिस मोगा यांच्याशी विवाह झाला होता.
“आम्ही पूर्णपणे भारतीय आहोत, आम्ही…”; स्फोटके सापडल्याप्रकरणी अटक झालेल्या डॉक्टरच्या कुटुंबीयांनी नेमकं काय सांगितलं?