-
गेल्या वर्षात 'टॉयलेट एक प्रेम कथा' आणि 'जॉली एलएलबी २' हे दोन दमदार चित्रपट दिल्यानंतर २०१८ हे वर्ष आपल्या आणखी काही हिट चित्रपटांनी गाजवण्यासाठी बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार सज्ज झाला आहे. महिलांना उपयोगी आणि वाजवी दरात नॅपकिन्स उपलब्ध करून देणाऱ्या अरुणाचलम् मुरुगानंदम् यांच्यावरील आधारित 'पॅडमॅन' चित्रपट उद्या ९ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अक्षय कुमार, राधिका आपटे आणि सोनम कपूर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाची निर्मिती ट्विंकल खन्ना आणि क्रिअर्ज एण्टरटेन्मेन्ट यांनी केली आहे. तर दिग्दर्शनाची धुरा आर बाल्की यांनी सांभाळली आहे. तुम्ही हा चित्रपट का पाहाल याची पाच कारणे.
-
अक्षय कुमार – गेल्या काही वर्षात अक्षय कुमार हा सामाजिक विषयांवर बेतलेल्या चित्रपटांचा बादशहा झाला आहे. प्रेक्षकांच्या मनाला भावेल अशी कथा आणि सत्य घटनांवर आधारित चित्रपटांतून लोकांपर्यंत महत्त्वाचे संदेश पोहोचवत आहे
-
प्रेरणादायी कथा – अरुणाचलम् मुरुगानंदम् यांच्या आयुष्यावर आधारित ही सत्यकथा आहे. अत्यंत कटू, कठीण अनुभवांना सामोरे जात मुरुगानंदम् यांनी तयार केलेली ही मशीन्स आज परदेशातही नावाजली जात आहेत. स्त्री-स्वातंत्र्याचा महत्त्वाचा घटक असलेल्या ‘लो कॉस्ट सॅनिटरी पॅड मूव्हमेंट’ ठरलेल्या या सॅनिटरी नॅपकिनच्या निर्मितीचा हा प्रेरणादायी प्रवास चित्रपटातून मांडण्यात आला आहे.
-
आर बाल्की – पा आणि इंग्लिश विंग्लिश यांसारखे चित्रपट आपल्या नावावर असलेल्या बाल्कींवर अक्षयने पॅडमॅनसाठी विश्वास ठेवणे अगदी स्वाभाविक आहे. एका मुलाखतीत ट्विंकल म्हणालेली की, मुरुगानंदम् यांची कथा माझ्या नजरेखालून गेल्यानंतर ही कथा लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून त्यावर चित्रपट काढण्याचा विचार माझ्या मनात आला आणि त्याचवेळी दिग्दर्शक आर बाल्कीचे नाव माझ्या मनात घर करून गेले. मी त्यांचे चित्रपट बघितले असून ते मला आवडले. ते एक संवेदनशील दिग्दर्शक आहेत आणि पत्नी गौरी शिंदेमुळे त्यांना महिलांच्या भावनांची बऱ्यापैकी जाणीव आहे. गौरीचा त्यांच्या आयुष्यावर चांगला प्रभाव आहे.
-
गैरसमजूतींना मोडीत काढणे – मासिक पाळीत घ्यावयाची काळजी आणि त्यावेळात महिलांना देण्यात येणारी वागणूक याविषयी समाजात बरेच गैरसमज आहेत. तेच मोडीत काढणे हा चित्रपटाचा उद्देश आहे. चित्रपटाद्वारे मासिक पाळीत घ्यावयाची काळजी याविषयी जागृती करण्याचे काम आम्ही या चित्रपटातून करणार असल्याचे ट्विंकल म्हणाली होती.
-
चित्रपटातील इतर कलाकार – अक्षयव्यतिरीक्त चित्रपटात राधिका आपटे आणि सोनम कपूर यादेखील महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत. राधिकाने ग्रामीण भागातील स्त्री आणि अक्षयची पत्नी गायत्रीची भूमिका साकारली असून सोनमने अक्षयची इंग्लिश टीचर रिआची भूमिका केली आहे.

चंद्रग्रहणाचा सुतक काळ…’ही’ वेळ खूप सांभाळायची आहे! यंदा ९ तास आधीच सुरू होणार, नियम, वेळ जाणून घ्या