अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येची घटना सर्वांच्याच मनाला चटका लावून गेली. सुशांतच्या आत्महत्येनंतर त्याच्या ५० स्वप्नांची यादी सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली. सुशांतने त्याच्या ५० स्वप्नांची यादी तयार केली होती आणि ते सारं त्याला करुन पाहायचं होतं. सुशांतची ही अपूर्ण राहिलेली स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार अभिनेत्री संजना सांघीने केला. “मी तुला वचन देते, तुझी अपूर्ण राहिलेली स्वप्न पूर्ण करण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेन. तू वचन दिलं होतंस की ही स्वप्न आपण एकत्र पूर्ण करु. परंतु आता तुझ्याशिवाय मला ही स्वप्न पूर्ण करावी लागणार आहेत”, अशी पोस्ट तिने लिहिली होती. विमान चालविण्याचं प्रशिक्षण, आयर्नमॅन ट्रायथलॉनचं ( स्विमिंग, सायकलिंग आणि रनिंग) प्रशिक्षण घेणे, जंगलात एक आठवडा राहणे, ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करणे, जवळपास १० नृत्यप्रकार शिकणे, शेती करायला शिकणे, अशा अनेक गोष्टी सुशांतच्या या यादीत होत्या. संजनाने सुशांतसोबत 'दिल बेचारा' या चित्रपटात एकत्र काम केलं. सुशांतचा हा शेवटचा चित्रपट ठरला. सुरुवातीला या चित्रपटाचं नाव 'किझी और मॅनी' असं ठेवण्यात आलं होतं. मात्र नंतर ते बदलून 'दिल बेचारा' ठेवण्यात आलं. संजनाने या चित्रपटात पहिल्यांदाच मुख्य भूमिका साकारली आहे. याआधी तिने रणबीर कपूरच्या 'रॉकस्टार' चित्रपटात छोटीशी भूमिका साकारली होती. सुशांतच्या आत्महत्येनंतर संजनाचीही पोलिसांकडून कसून चौकशी झाली. तब्बल नऊ तास पोलिसांनी तिची चौकशी केली. 'दिल बेचारा' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सुशांतने संजनासोबत गैरवर्तन केल्याच्या अफवा होत्या. 'मी टू' मोहिमेअंतर्गत ही अफवा पसरली होती. मात्र ते सर्व आरोप खोटे असल्याचं संजनाने पोलिसांच्या चौकशीत स्पष्ट केलं. सुशांतवर मी कधी 'मी टू'चे आरोप केलेच नव्हते, असं ती म्हणाली. पण या आरोपांच्या अफवांमुळे सुशांत फार निराश होता, असं तिने पोलिसांना सांगितलं. -
सर्व छायाचित्र सौजन्य : इन्स्टाग्राम- संजना सांघी

Raja Gosavi : “पितळी भांडी विकून गुजराण, ब्रेड आणि आमटी…” राजा गोसावींच्या मुलीने उलगडली सुपरस्टारची हलाखी