‘कसे आहात सगळे, हसताय ना..? हसायलाच पाहिजे..’असं आपुलकीने विचारणारा सूत्रसंचालक म्हणजे डॉ. निलेश साबळे. डॉक्टर ते अॅक्टर हा प्रवास कसा सुरू झाला याबद्दल त्याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं. 'टाइम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या या मुलाखतीत तो म्हणाला, "शाळेत असताना अनेक स्पर्धांमध्ये मी भाग घ्यायचो. वैद्यकीय पदवी मिळवल्याबद्दल माझे आई-वडील फार खूश होते." "वाशी इथल्या एमजीएम न्यू बॉम्बे रुग्णालयात मी सहा महिने कामसुद्धा केलं होतं. तेव्हा 'महाराष्ट्राचा सुपरस्टार'बद्दल मी ऐकलं आणि त्यात सहभागी होण्यासाठी आईवडिलांची परवानगी घेतली. मला अभिनय क्षेत्रात करिअर करण्याबद्दल तेव्हा मी घरी सांगितलं होतं." निलेशच्या आईवडिलांनी त्यासाठी परवानगी तर दिली पण जर पुढच्या दोन वर्षांत काहीच होऊ शकलं नाही तर पुन्हा वैद्यकीय क्षेत्रात परतायचं, असं त्यांनी ठामपणे बजावलं होतं. "नशिबाने मी अभिनय क्षेत्रात यशस्वी झालो आणि आता जे करतोय त्यात खूप खूश आहे", असं तो पुढे म्हणाला. वैद्यकीय शिक्षणाचा फायदा आता कसा होतो याबद्दलही त्याने सांगितलं. "'चला हवा येऊ द्या'च्या सेटवर जर कोणाला बरं वाटत नसेल तर ते आधी माझ्याकडे येतात. अनेकदा मी भाऊ कदम, कुशल बद्रिके यांना इंजेक्शन दिलंय. त्यामुळे माझ्या वैद्यकीय शिक्षणाचा फायदा मला इथेही होतोय", असं तो म्हणाला. निलेश साबळेची पत्नीसुद्धा डॉक्टर आहे. "सध्याच्या करोनाच्या परिस्थितीला डॉक्टर्स, नर्सेस ज्याप्रकारे लढा देत आहेत, ते खरंच कौतुकास्पद आहे. डॉक्टर असल्यामुळे ते काम किती अवघड आहे, याची मला जाणीव आहे," अशा शब्दांत त्याने भावना व्यक्त केल्या. "पीपीई किट्स घालून दिवसभर काम करणं किती अवघड आहे, हे माझे डॉक्टर मित्रमैत्रिणी सांगत असतात," असं म्हणत त्याने डॉक्टर्स व नर्सेसना सलाम केला. निलेश साबळे 'लाव रे तो व्हिडीओ' या कार्यक्रमाच्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Video : फ्लाइट कॅप्टन भाचीकडून विमानात खास उद्घोषणा! पद्मश्री अशोक सराफ यांचं केलं अभिनंदन; म्हणाली, “माझे काका…”