-
महानायक अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना करोनाचा लागण झाली आहे. दोघांनाही शनिवारी रात्री उशीरा मुंबईमध्ये नानावटी रुग्णालयामध्ये दाखल केलं आहे. अमिताभ यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर ट्विटवरुन त्यांच्या चाहत्यांबरोबरच अनेक सेलिब्रिटींनी चिंता व्यक्त करतानाच बच्चन पिता-पुत्र लवकर बरे होवोत अशी इच्छा व्यक्त केली आहे.
-
अनेकांनी अमिताभ यांच्यासाठी आपण प्रार्थना करत असल्याचे म्हटले आहे. तर काहींनी अमिताभ यांचे वय आणि त्यांच्या प्रकृतीसंदर्भातील इतिहासाचा संदर्भ देत अमिताभ यांना अधिक काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. आतापर्यंत त्यांनी अनेक गंभीर आजारांवर मात केली आहेच. आताही ते करोनावर मात करतील, अशी खात्री त्यांच्या चाहत्यांना आहे. याच पार्श्वभूमीवर जाणून घेऊयात अमिताभ यांच्या आरोग्यविषयक इतिहास…
-
१९८३ साली कुली चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान अमिताभ जखमी झाले होते. पुनीत इस्सर या कलाकाराबरोबर मारमारीच्या एका दृष्याच्या चित्रिकरणादरम्यान अमिताभ यांना गंभीर दुखापत झाली होती.
-
अंतर्गत रक्तस्राव झाल्याने अमिताभ यांच्या शरीरामधील रक्ताचे प्रमाण कमी झालं होतं. यावेळी त्यांच्या जवळवजळ २०० चाहत्यांनी रक्तदानाच्या माध्यमातून ६० बाटल्या रक्त जमा केलं होतं. अमिताभ यांना देण्यात आलेल्या रक्तापैकी एक बाटली ही 'हिपाटायटिस बी'चा (एक प्रकारची कावीळ) संसर्ग झालेल्या रक्तदात्याची होती. हे रक्त अमिताभ यांना चढवण्यात आल्याने त्यांनाही याचा संसर्ग झाला.
-
'कुली'च्या चित्रिकरणादरम्यान झालेली जखम ही खूपच धोकादायक होती. काही वर्षांपूर्वीच अमिताभ यांना पोटदुखीचा त्रास होऊ लागल्याने त्यांनी तपासणी केली. त्यानंतर त्यांच्या छोट्या आतड्यावर एक शस्त्रक्रीयाही करण्यात आली.
-
अमिताभ यांच्यावर करण्यात आलेल्या शस्त्रक्रियेला वैद्यकीय भाषेत डाइवर्टिक्युलाइटिस ऑफ स्मॉल इंटेस्टाइन असं म्हणतात. अमिताभ यांना झालेल्या या आजारामुळे सतत पोट दुखणे, अन्न पचनाला त्रास होणे यासारख्या समस्या निर्माण झाल्या होत्या.
-
'कुली'च्या चित्रिकरणादरम्यान झालेल्या दुर्घटनेनंतर अमिताभ यांना औषधांचे स्ट्रॉग डोस देण्यात आले होते. म्हणजेच अमिताभ यांना होणारा त्रास कमी व्हावा म्हणून अधिक क्षमतेची औषधं त्यांना देण्यात आली. त्याचाही त्यांच्या आरोग्यावर परिणाम झाला.
-
'कुली'च्या चित्रिकरणादरम्यान झालेल्या आजारामधून बरं झाल्यानंतर त्यांना मायस्थेनिया ग्रेविस नावाचा आजार झाला. हा एक न्यूरोमसक्युलर म्हणजेच शरीरातील पेशी आणि मज्जातंतूशी संबंधित आजार असून यामध्ये अंग दुखणे आणि सतत थकवा येण्याचा त्रास होतो.
-
अमिताभ यांनी एका मुलाखतीमध्ये हेपेटायटस बीच्या संसर्गामुळे त्यांच्या यकृतावर (लिव्हरवर) काय परिणाम झाला होता हे सांगितलेलं. 'कुली'च्या अपघातानंतर उपचारादरम्यान हिपाटायटिसचा संसर्ग झाल्यानंतर ते त्यामधून बरे झाले. मात्र १८ वर्षानंतर एकदा रुटीन हेल्थ चेकअपदरम्यान या हिपाटायटिसचे त्यांच्या यकृतावर किती गंभीर परिणाम झाले आहेत हे समजलं.
-
हिपाटायटिसमुळे अमिताभ यांच्या यकृतावर गंभीर परिणाम झाल्याचे दिसून आलं. अमिताभ यांना लिव्हर सिरॉसिस झाल्याचं तपासणीमध्ये समोर आलं. त्यामुळेच २०१२ मध्ये त्यांच्या यकृताचा संसर्ग झालेला ७५ टक्के भाग काढून टाकण्यात आला.
-
मागील आठ वर्षांपासून अमिताभ यांच्या शरीरामधील प्रक्रिया या २५ टक्के यकृतावर काम करत आहेत. यासंदर्भात जेव्हा जेव्हा अमिताभ आरोग्य तपासणीसाठी रुग्णालयामध्ये दाखव होतात त्यावेळी बातम्यांमधून सांगितलं जातं.
-
'कुली'च्या सेटवर झालेल्या एका अपघातामुळे आणि त्यानंतरच्या उपचारांदरम्यान अमिताभ यांना बऱ्याच आरोग्यविषयक समस्यांना तोंड द्यावे लागले. या अपघाताचा आणि त्यानंतर निर्माण झालेल्या आरोग्य समस्यांचे दृष्परिणाम आजही अमिताभ यांच्या प्रकृतीवर दिसून येत आहे.
-
अमिताभ यांना अस्थमाचाही त्रास आहे. अस्थमा हा फुप्फुसांशी संबंधित आजार आहे. या आजारामध्ये शरीरीमध्ये ऑक्सीजन पुरवणाऱ्या वाहिन्या आकुंचन पावतात आणि शरीरामध्ये योग्य प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही. धूळ आणि धूरामुळे अस्थमा रुग्णांना त्रास होतो.
-
अमिताभ यांनी एका मुलाखतीमध्ये २००० साली क्षयरोग म्हणजेच टीबी झाल्याची माहिती दिली होती. योग्यवेळी उपचार घेतल्याने अमिताभ या आजारामधून लगेच बरे झाले.
-
"टीबी हा आजार मला होऊ शकतो तर कोणालाही होऊ शकतो. योग्य वेळी औषधं घेतल्यास टीबी पूर्णपणे बरा होऊ शकतो," असंही अमिताभ यांनी यावेळी सांगितलं होतं. ( गॅलरीमधील सर्व फोटो हे फाइल फोटो आहेत)

‘हे’ झाड तारक की मारक ? इतर राज्यात बंदी, महाराष्ट्रात मात्र धडाक्यात…